अमेरिका-इराणमधील तणावामुळे सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ ; जाणून घ्या आजचा दर

0

नवी दिल्ली : आधीच मोठ्या उच्चांकावर पोहोचलेल्या सोने व चांदीच्या भावात आता पुन्हा अमेरिका व इराणमधील तणावामुळे मोठी भाववाढ झाली आहे. मागील दोन दिवसांत सोन्याच्या दरांत प्रति दहा ग्राम (तोळा) १८०० रूपयांची वाढ झाली आहे. लगीन सराईच्यादिवसांमध्ये सोन्याचे दर गगनाला भिडल्यानं सर्वसामान्य ग्राहकांकडून मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. वर्षाच्या सुरूवातीला एक जानेवारी रोजी सोनं प्रति तोळा ३९ हजार ५०० रुपये होते. दोन जानेवारीला १०० रुपयांनी वाढून ते ३९ हजार ६०० रुपये प्रति तोळा झाला.

दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सर्वच ठिकाणाच्या बाजारपेठांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्थानिक बाजारपेठ असो किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, सोन्याच्या दरांत वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरांत प्रति तोळा ८५० रूपयांनी वाढ झाली होती. आठवड्याच्या सुरूवातीलाच सोमवारी सोन्याच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. शुक्रवारी दोन टक्क्यानं वधारलेलं सोनं सोमवारी पुन्हा महागलं आहे. सोमवारी गोल्ड मार्केट सुरू झाल्यानंतर साेने प्रति तोळा ४१ हजार रुपयांच्याही पुढे गेले होते. त्यानंतर दिवसअखेर सोन्याचा भाव प्रति तोळा ४०,९३९ रूपये असा स्थिर झाला. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर सतत वाढताना दिसत आहेत. सोन्यासोबतच चांदीच्या दरानेही गगनभरारी घेतली आहे. भारतात चांदीचा भाव प्रति किलो ५१,०४२.०० रूपये होता.

Leave A Reply

Your email address will not be published.