अचानक वाढला अहवालाचा प्रवास! भाग – ६

0

वेळ मारुन नेण्यासाठी अधिकार्‍यांची शक्कल : बुरशीयुक्त शेवयांचे प्रकरण

जळगाव, दि. 14 –
जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांना पुरवठा होणार्‍या शेवयांच्या बुरशीयुक्त प्रकरणाने सर्वांचीच झोप उडविली असताना रँडम पद्धतीने चौकशी झाली असताना देखील या अहवालाचा प्रवास वाढल्याने आर्श्‍चय व्यक्त होत आहे. पुरवठादाराची चौकशी न करता केवळ कागदीघोडे नाचविण्यावर अधिकारी कर्तव्य बजावित असून हे प्रकरण गुर्‍हाळातच फिरत असल्याने शंकेची पाल कुचकुचत आहे.
पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव येथील बुरशीयुक्त शेवयांनी जिल्हा परिषद प्राशसनाचे झोप उडविली असताना देखील लोकप्रतिनिधी व अधिकारी मात्र ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असताना दिसून येत आहेत. अंबेवडगाव येथील अंगणवाडीत शेवयांना लागलेली बुरशीयुक्त पॉकीटे प्रशासनाने जप्त केली असताना देखील जिल्हाभरात केवळ दिखावा दाखविण्यासाठी प्रशासनाने रँडम चौकशीचे आदेश देवून त्यांच्या अहवालाची वाट पाहिली जात आहे. मुळातच ठेकेदाराने पुरवठा केलेल्या शेवया ह्या खाण्यास योग्य नाही हे प्रथमदर्शनी सिद्ध होत असून देखील चोर सोडून सन्याशाला फाशी देण्याचा प्रकार जिल्हा परिषदेने चालविला आहे. जिल्हाभरातील 15 तालुक्यांमधून अंगणवाड्यांची रँडम पद्धतीने चौकशी करुन त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासन कारवाईचा फास आवळणार असला तरी या प्रकरणातील मुख्य दोषी प्रशासनाच्या डोळ्यासमोर असताना देखील त्याला पडद्याआड करण्याचा प्रयत्न चालविला आहे. रँडम पद्धतीच्या चौकशीच्या माध्यमातून केवळ कागदीघोडे नाचविण्यात जि.पला स्वारस्य दिसून येत असून प्रशासन व लोकप्रतिनिधी ठेकेदाराच्या गैरकृत्यालाच पुरवठाच देत असल्याची चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.