बापरे.. कोविड लसीकरणाचे पोर्टल हॅक; ४५ जणांवर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिवसेंदिवस कोरोना विषाणू थैमान घालत आहे. यावर मात करण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी लसीकरण नोंदणी करण्यात येणारे पोर्टल हॅक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बोदवड शहरात शासकीय पोर्टल हॅक करून कोरोनाची लस टोचल्याची नोंद दाखवीत चक्क ४५ जणांनी लस घेतल्याचे बोगस प्रमाणपत्र मिळवून लसवंत झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. ज्यांच्या नावाच्या या बोगस नोंदी झाल्या आहेत. ‘त्या’ ४५ जणांविरोधात आरोग्य अधिकारी कपिल पवार यांचा तक्रारीवरून येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

बोदवड येथील दत्त कॉलनी व उर्दू शाळा परिसरात लसीकरण मोहीम ३१ रोजी एनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कपिल पवार यांनी पथकासह राबविली. दीड तासात त्यांनी ९८ जणांचे लसीकरण केले होते. ही नोंद रीतसर शासकीय पोर्टलवरही केली होती; परंतु नंतर सदर पोर्टलवर त्यांनी नोंदणीची आकडेवारी पाहिली असता त्यावर लसीकरण मात्र तब्बल १४४ नागरिकांचे झाल्याचे दिसून आले. यावरून त्यांनी आरोग्य सेविकेच्या रजिस्टरमधील नोंदी पाहिल्या असता फक्त ९८ नागरिकांनीच लस घेतल्याची नोंद आढळली. यावेळी हा लक्षात आला.

दरम्यान पोर्टलवर मात्र तब्बल ४५ नावे लसीकरण न करताच वाढलेली दिसून आली. त्यांनी डेटा ऑपरेटरशी चर्चाही केली; परंतु सदर लसीकरणाची नोंद करणारे पोर्टल हे अज्ञात व्यक्तीने हॅक करीत या नोंदी केल्याचे सांगण्यात आले. एनगाव आरोग्य अधिकारी कपिल पवार यांनी बोदवड पोलिसांत ‘त्या’ ४५ नागरिकांविरुद्ध तक्रार दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here