भुसावळ :- नेहमी २४तास ऑन ड्युटी म्हणत आपले कर्तव्य व जबाबदारी सांभाळणा-या खाकी वर्दीतही माणूस असतो. मात्र या पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना बहुदा सण उत्सवांचा आनंद घेता येत नाही. मात्र धूळवडी निमित्त येथील पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी दैनंदिन कामाला बाजूला ठेवत मोठ्या उत्साहात रंगांची उधळण करीत आनंदाने होलिकोत्सव साजरा केला.
पोलीस नेहमी कुठल्यानं कुठल्या कामात अडकलेलेच असतात. कधी बंदोबस्त तर कधी कायदा-सुव्यवस्था. त्यामुळे त्यांना कुठल्याही सणाचा आनंद घेता येत नाही. नागरिकांना सर्व सणांचा आनंद लुटता यावा यासाठी पोलीस नेहमी आपले कर्त्यव्य बजावत असतो.कुठलीही विपरीत घटना घडू नये किंवा वातावरण गंभीर होऊ नये, यांची काळजी देखील पोलिसच घेत असतात.
भुसावळ येथील पोलीस उपविभागीय अधिकारी व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी गुरुवारी कामाचा तणाव थोडा बाजूला ठेवत होळीचा आनंद लुटला. पोलीस कर्मचारी आपल्या वरिष्ठांसमोर जाण्यासाठी कचरतात परंतु कर्मचारी व अधिकारी असा कुठलाही भेद न ठेवता, एकत्रित होळीचा आनंद घेतला.