यावल वनविभागातील सात वनपरिक्षेत्रापैकी रावेरमध्ये सर्वाधिक प्राण्यांची नोंद…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहायक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या नेतृत्वाखाली बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात पर्यटकांना वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्याचा आनंद घेण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती.
यावेळी यावल वनविभागातील सात वनपरिक्षेत्रापैकी रावेरमध्ये सर्वाधिक प्राण्यांची नोंद झाली आहे. या वनक्षेत्रात वाघ, बिबट्यासह वन्यप्राण्यांचे दर्शन वन्यप्रेमींना झाले.
त्यासाठी चोपडा वनक्षेत्रात ३, वैजापूरला ७, अडावद ४, देवझिरी ४, यावल पूर्वमध्ये ७, पश्चिममध्ये ६ तर रावेर वनक्षेत्रात १२ अशा ४२ मचाण उभारण्यात आल्या होत्या. बुध्द पौर्णिमेला सायंकाळी ५ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत वन्यप्राण्यांची प्रगणना करण्यात आली.
यात वाघ आणि बिबट्यांसह, अस्वल, कोल्हा, तडस, निलगाय, चिकारा, चितळ, भेकर, सायाळ, रानडुक्कर, माकड, मोर, घुबड, सर्पगरुड, रातवा, कापशी घार, धामणसाप, घोणस, मन्यार, रानमांजर, ससा, मोर आदी वन्यप्राणी पर्यटकांना समोरून बघता आले. चिंचाटी धरणावरील अंजन मचानीवर असलेले वन्यजीप्रेमी अर्जुन ठाकुर, वनरक्षक राजु बोंडल यांना वाघाचे दर्शन झाले. रावेर वनक्षेत्रातील गारबर्डी, लोहारा, कुसुंबा या सफारी क्षेत्रात ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. या मोहिमेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, रेल्वेच्या डीआरएम इति पांडे, फैजपूरच्या प्रांताधिकारी तथा परिविक्षाधीन जिल्हाधिकारी देवयानी यादव यांच्यासह अनेक अधिकारी ततः प्राध्यापक व पर्यटकांनी यात सहभाग घेतला होता.
यावल वन विभागात गेल्या दोन वर्षापासुन सातपुडा परिसरात वन्यप्राण्यांकरीता पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने कामे करण्यात आलेली आहे. त्यामुळे सातपुडा परिसरात जैविक विविधता निर्माण झालेली आहे व वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
– जमीर एम.शेख, उपवनसंरक्षक.

वनक्षेत्रनिहाय प्राण्यांची नोंद
चोपडा: २७
वैजापूर :५८
अडावद : २२
देवझिरी : ३४
यावल पूर्व: ७८
यावल पश्चिम : ६४
रावेर : ३०१
एकूण : ५८४

Leave A Reply

Your email address will not be published.