श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अभंग -27

सुफळ हा जन्म होईल

माझीये जातीचें मज भेटो कोणी I आवडीची धणी फेडावया II1II
आवडे ज्या हरि अंतरापासूनि I
ऐसियाचे मनींअर्थ माझें II ध्रु II
तयालागीं जीव होतो कासावीस I पाहतील वास नयन हे II2II
सुफळ हा जन्म होईल तेथून I
देतां अलिंगन वैष्णवांसी II3II
तुका म्हणे तोचि सुदिन सोहळा I
गाऊं या गोपाळा धणीवरि II4II

अभंग क्रमांक 1995

एका खेडूत व्यक्तीला कोणीतरी संगीत नाटकाचे तिकीट देते. तो नाटकाला जातोही पण “नाही मी बोलत नाथा…” हे पद अनेक वेळा म्हणून झाल्यावर तो म्हणतो ” नाही बोलायचे तर बोलू नको, तिकीटचे पैसे टाक” यातील विनोद सोडला तर दोन व्यक्तींमध्ये संवाद घडायला अलीकडच्या भाषेत बोलायचं तर केमिस्ट्री जुळावी लागते. आवड व विषयाचे ज्ञान यात साम्य लागते मग आनंद मिळतो. अगदी तत्त्वज्ञानाच्या गप्पा नकोत. दोन साध्या समवयस्क गृहिणी “साबुदाणा पापड्या’ या विषयावरही बोलु शकतात. दोन लहान मुलं, दोन तरुण मुली किंवा दोन वृद्ध मंडळी यांच्यातील बोलणं चैतन्यदायीच असते. त्यांचं त्यांचं एक विश्व व त्यातील अनुभव त्या व्यक्त करतात. परमार्थ हा निर्बुद्ध माणसाचा प्रांत नाही. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत समाजायला काही एक पात्रता लागते आणि मुख्य म्हणजे आवडही लागते. “तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येरागबाळाचे काम नोहे” श्रवण, वाचन, मनन, चिंतन हे व्यक्ती परमार्थाची अधिकारी असेल तरच शक्य होते, अन्यथा नाही. म्हणूनच महाराज देवाकडेच मागणे मागतात, ज्याला मनापासून हरिभक्त आवडते, जो नाम संकीर्तन करतो, काही एक उपासना तो निरंतर करतोय, आवडीने भावे हरिनाम घेतोय त्याची व माझी भेट नक्की घडवून दे. या भक्तांपुढे जात पात हा विचारच नसतो. ते हरिमय होऊन गेलेले असतात. माऊलीही म्हणते “यतीकुळ माझे गेले हारपोनि I श्रीरंगा वाचोनी आनु नोहे I” अशी हरिदासांची व विष्णूमय जग झालेल्या विष्णूदासांची स्थिती असते.

माऊली पासून चोखामेळा पर्यंत अठरापगड जातीतले संत आपण शिरसावंद्य मानतो कारण या विष्णुदासांचे मोठेपण कितीही शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तर तो होत नाही. विष्णुदासांना दुसरी कोणतीही आशा नसते “एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती” त्यामुळे ते खरे भाग्यवंत असतात. कारण त्यांना पाहून यमाचे दूतही दूर पळतात. ते शूर असतात विरही असतात. भूमीवर केवळ नामाचा जयजयकार असतो. त्यांच्या सहवासात सहज योग साधतो. ते दासाचा भार घेतात,त्याला आत्मनिर्भर बनवतात. किंबहुना प्रेमाने कडेवरही घेतात. पिढीजात धन सात जन्म पुरेल याहून अधिक नाही पण यांच्या सहवासात जे धन लाभते त्याचा नाश कधीच होत नाही किंबहुना ते संपतच नाही. त्यामुळे त्यांचे शब्द कधी कानावर पडतील असे वाटते. नयन त्यांना पाहण्यासाठी आसुसलेले असतात. जीव त्यांच्या भेटीसाठी कासावीस होतो. त्यांच्या समाचाराचीच वाट पाहत राहतो. त्यांना पाहूनच बळ येते, शक्ती मिळते व त्यांच्या भेटीत केवळ प्रेमाचा सुकाळ सुखाचा सुकाळच अनुभवयास मिळतो. यांचा खेळ पहावयास मिळतो पंढरीच्या वाळवंटात चंद्रभागे तिरी. ते वैष्णव ठायी ठायी दंभ अभिमान व जात-पात सगळ विसरून ते एकमेकांना मिठी घालीत असतात. त्यांचं चित्त निर्मळ असते मग ते पाहून पाषाणालाही पाझर फुटतात. त्यांच्यामुळेच हा दुस्तर भवसागर तरुण जाण्याची वाट मोकळी होते. प्रतिवर्षी आषाढी एकादशीला जी वारी होते त्यात हा अनुपम सोहळा आजही आपण अनुभवतो. तुकाराम महाराज म्हणतात तसे ‘मातले वैष्णव वीर रे’. अशा वैष्णवांची व्याख्याच जणु ते करतात,” वैष्णव तो जया I अवघी देवावरी माया I नाही आणिक प्रमाण I तन धन तृण जन” काही दुखणं खुपण देहाला आले तरी त्याचा नेमाचा निर्धार ढळत नाही. तो यतिहीन असला तरी या वैष्णवां संगतीत जीवाला सुख प्राप्त होते. त्यामुळे त्यांच्याच भेटीसाठी माझा जीव कासावीस आहे.

आपल्या व्यक्तिगत आयुष्यातही आपण नामकरण विधी पासून ते सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यापर्यंत अनेक सोहळे साजरे करतो. हे नक्कीच मंगलकारक व भाग्यकारक आहे. पण याने आपला जन्म सफल होत नाही. जेव्हा आपण विचार करतो पद, प्रतिष्ठा, नावलौकिक सारेच कायमस्वरूपी आपल्याबरोबर असणार नाही तर एक ‘गिरीधर गोपालच’ आपल्याला शेवटपर्यंत साथ देणार आहे हा विचार असेल तर जन्माचे सार्थक होते व प्रपंच करतानाही ‘राम कृष्ण हरी गोविंद’ हे आपण विसरत नाही. लौकिक नातेसंबंधात आपण सोहळे करतो त्यात कौतुकाचाच भाग अधिक असतो. पहा ना अधिक मासात लेकीचं लग्न होऊन पहिल्यांदाच जावई आला तर आपण जावयाला चांदीच्या ताटात आपदान देतो हे सर्व मोठ्या भावांन व प्रेमाने आपण करतो. खरं तर हे काही सक्तीचे नाही किंवा केलं नाही तरी काही प्रसंग ओढवतो असेही नाही. हा जो प्रेमयुक्त अंत:करणाचा देण्याघेण्याचा व्यवहार होतो. तो तसा न ठरता फार पवित्र व मंगलकारक असाच सोहळा आपण साजरा करतो.

तसेच प्रभूप्रेमात भक्तीत आपण सक्ती न आणता कौतुक आणावे. केवळ कौतुक न करता ते कोड कौतुक म्हणजे खूपच आवडीने प्रभूच गुणगान कराव, पुजा करावी,आरती करावी. नैवेद्य दाखवावा, नामघोष तर या सर्वांचा प्राण असावा. म्हणून तर सज्जनगडावर ‘जय जय रघुवीर समर्थ’, आळंदीला ‘ज्ञानोबा माऊली’ तर देहूत ‘राम कृष्ण हरी’ या मंत्रांचा जयघोष अखंड कानी पडतो तेव्हा एक स्फुरण आपल्यालाही चढते. “चढते वाढते वाढवावे भजन देवाचे” ही खूण गाठ पक्की मनी बसते.” देव मस्तकी धरावा अवघा हल्लाकल्लोळ करावा” असा सामुदायिक भक्तीत सहजभाव येतो. त्याला एक वेगळाच रंग असतो. नव्हे तो भाव “अभंग” च असतो.

श्रीकृष्ण शरणं मम् ……

लेखिका -भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.