तांत्रिक बिघाड; पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भाग अंधारात

0

लोकशाही न्युज नेटवर्क 

 

पुणे – पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भाग अंधारात. अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या चार तासांपासून पुण्यातील शहर आणि ग्रामीण भागासह पिंपरी चिंचवडमधील वीजपुरवठा खंडीत झालेला आहे. वीजपुरवठा खंडीत झाल्याने पाणीपुरवठाही बंद झाला आहे. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत हा वीजपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पहाटे साडेचारच्या सुमारास चाकण आणि लोणीकंद येथील ४०० केव्ही अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रांमधील उपकेंद्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पहाटेपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांबरोबरच ग्रामीण भागातील वीजपुरवठा टप्प्याटप्याने बंद होत गेला.

तेव्हापासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरातील वीजपुरवठा पूर्णपणे बंद आहे. पहाटेच वीजपुरवठा खंडीत झाल्याने दोन्ही शहरातील पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. दरम्यान, हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, ११ वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

अतिशय दाट धुके व दवं यामुळे या टॉवर लाईनमध्ये बिघाड झाल्याची शक्यता असल्याचे महापारेषणकडून सांगण्यात आले. तसेच महत्वाचे दोन ४०० केव्ही अतिउच्च दाब उपकेंद्र बंद असल्याने पर्यायी वीज पुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकली नाही.

दरम्यान महावितरणकडून याबाबतची माहिती वीज ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे देण्यात येत आहे. महापारेषणचे सर्व वरिष्ठ अभियंता सध्या टॉवर लाइनमधील बिघाड शोधण्यासाठी युद्धपातळीवर पेट्रोलिंग करीत आहेत.

सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागू शकतो. सकाळी ११ वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होऊ शकेल. या कालावधीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.