दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.  प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणदानवरही भरारी पथकांची नजर राहणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेला हजर असतील व चांगल्या प्रकारे प्रात्यक्षिक देतील त्यांनाच पैकीच्या पैकी गुण मिळतील. म्हणजेच गैरहजर किंवा प्रात्यक्षिक अपूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना आता मनमानी पद्धतीने गुण मिळणार नाही.

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० ते २९ फेब्रुवारी या कालावधीत तर इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा २ ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. बोर्डाच्या परीक्षांपूर्वी शाळा- महाविद्यालयांनी सराव चाचण्यांद्वारे परीक्षेची तयारी सुरू केली आहे. यावर्षी पुणे बोर्डाने परीक्षेसाठी सरमिसळ पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आता एकाच शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा देतील.

अनेक कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी थेट बोर्डाच्या परीक्षेलाच येतात. महाविद्यालयांनी पटसंख्या टिकविण्यासाठी अनेकांचे प्रवेश कागदोपत्री केलेले असतात अशीही वस्तुस्थिती आहे. शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागावा, निकालामुळे पुढच्या वर्षी १०० प्रवेश होतील हाही त्यामागील हेतू असतो. त्यामुळे कित्येक दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा न घेताच त्यांना १८ ते २० गुण (२० पैकी) दिले जातात. त्यासंदर्भात अनेक तक्रारी बोर्डाकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बोर्डाचे आता शाळांकडून प्रात्यक्षिक घेतले जाते का, विज्ञानाचे प्रयोग होतात का, याची पडताळणी करण्यासाठी बोर्डाने विशेष पथके नेमली आहेत. ही पथके प्रात्यक्षिक परीक्षा काळात वेगवेगळ्या शाळा- महाविद्यालयांना अचानक भेटी देतील.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अंतिम वेळापत्रकानुसार बारावी बोर्ड परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत होणार आहे. तर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमनिहाय (शाखा) मंडळाने http://www.mahasscboard.in या संकेतस्थळावर परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध करून दिले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.