दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ

0

मुंबई : लोकशाही न्युज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांचे निकाल काही दिवसांतच जाहीर होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. निकालांपूर्वीच्या वातावरणात येत्या वर्षी म्हणजेच २०२४-२५ या शैक्षणिक वर्षादरम्यान दहावी आणिबारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी तसेच बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षादरम्यान होणाऱ्या परीक्षांसाठी १२ टक्के शुल्कवाढ करण्यात आली असून विद्यार्थ्यांना प्रशासकीय शुल्क, गुणपत्रिका शुल्क, प्रमाणपत्र शुल्क, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क यासाठीही विद्यार्थ्यांना पैसे भरावे लागणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, छपाई आणि स्टेशनरी महागल्यामुळे दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंडळ कार्यकारी परिषदेने घेतला आहे.

राज्य शिक्षण मंडळ कार्यकारी परिषदेच्या वतीनं इयत्ता दहावीच्या परीक्षा शुल्कात ५० ते १०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सदर निर्णयानंतर १७ नंबरचा परीक्षा अर्ज, नावनोंदणी शुल्कही महागलं आहे. १७ नंबरचा अर्ज/ फॉर्म भरून खासगीरित्या दहावीच्या परीक्षेला बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता सर्वाधिक परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.