सामाजिक कार्यकर्त्या रुमादेवींच्या प्रेरणादायी संवादाचा जाहीर कार्यक्रम

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राजस्थान येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रुमादेवी यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी कथा ऐकण्याची जळगावकरांना सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे रविवारी दि. ३ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता संभाजीराजे नाट्यगृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

प्रसंगी अध्यक्षस्थानी माजी खासदार ईश्वरलाल जैन राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, नयनतारा बाफना, माजी महापौर प्रदीप रायसोनी, रमेश जैन, सुवर्ण उद्योजक अजय ललवाणी, मनीष जैन, सुशील बाफना, संजय लोढा हे उपस्थित राहणार आहे.

रुमा देवी एक सामाजिक कार्यकर्त्या, बाडमेर, राजस्थान येथील भारतीय पारंपारिक हस्तकला कारागीर आहेत. रुमा देवी यांना भारतातील महिलांसाठी “नारी शक्ती पुरस्कार २०१८” हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला. तीस हजारहून अधिक ग्रामीण महिलांच्या नेटवर्कशी निगडीत आहे, त्यांना प्रशिक्षित केले आहे आणि त्यांना उपजीविकेशी जोडले आहे.

आयडब्लूजीआयचा यावर्षीचा सामाजिक कार्य श्रेणीतील पुरस्कार रुमा देवी यांना मिळाला आहे. सामाजिक परिवर्तनासाठी रूमादेवींनी स्वतःला झोकून दिलं आहे. रूमादेवींनी ‘दीप दवल’ नावाचा स्वंय सहायता गट अत्यंत कमी भांडवलामध्ये सुरू केला. रूमादेवींनी शिलाई मशीन घेऊन कपडे शिवायला सुरूवात केली. २००८ मध्ये त्या जीव्हीसीएस या संस्थेच्या सदस्या झाल्या. त्यातून त्यांनी महिलांच्या उत्थानासाठी कामं करायला सुरूवात केली. त्यांच्या या कामाची दखल घेत त्या पुढे जीव्हीसीएसच्या अध्यक्ष निवडल्या गेल्या होत्या.

रुमादेवी ह्या “कौन बनेगा करोडपती” कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्या शो मध्ये सहभागी झालेल्या आहेत. हा सोहळा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे संध्याकाळी ५ वाजता सुरु होईल. कार्यकर्ते व नागरिकांनी वेळेवर उपस्थिती द्यावी असे आवाहन  अध्यक्ष आनंद चांदीवाल, सचिव विनय गांधी, कोषाध्यक्ष पारस कुचेरिया यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.