यूक्रेनमध्ये सक्तीची सैन्य भरती, सामान्य लोकांनाही दिली शस्त्र

0

रशियाने युद्धाची घोषणा केल्यानंतर रशियानं लष्करी हल्ला सुरु केल्याने यूक्रेन सध्या संकटात सापडला आहे. त्यातच अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांनी सैन्य पाठवण्यास नकार दिल्याने यूक्रेनसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

त्यात यूक्रेननं कीवच्या बाहेरील एअरपोर्ट पुन्हा ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. देशातील सध्याची परिस्थिती पाहता १८-६० वयोगटातील सर्व पुरुषांना देशाबाहेर जाण्याची बंदी घातली आहे.

यूक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की यांनी देशातील आपत्कालीन स्थितीमुळे सक्तीची भरती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे १८ ते ६० वयोगटातील पुरुषांना देशाबाहेर जाण्यास मनाई केली आहे. ६० हजार सैन्य देशाच्या रक्षणासाठी तैनात असल्याचं यूक्रेननं सांगितले आहे. पुतिन यांनी यूक्रेनच्या सीमेवर जवळपास १ लाख ९० हजार सैनिक पाठवले आहेत असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

दोन्ही देशातील युद्धात आतापर्यंत १३७ नागरिकांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक जखमी झाले आहेत. यूक्रेनच्या आरोग्य मंत्रालयाने आरोग्य सुविधा सज्ज करण्याचे आदेश दिलेत. जेणेकरून युद्धजन्य परिस्थितीत जखमी लोकांना आणि सैन्यांना तात्काळ आवश्यक उपचार दिले जातील.

रशियानं गुरुवारी यूक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच यूक्रेनची राजधानी कीववर मोठा स्फोट झाला. पूर्व यूक्रेनवर रशियानं केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओही समोर आला. बॅलेस्टिक, क्रूज मिसाइल हल्ल्यानं कीवच्या अनेक ठिकाणांना टार्गेट करण्यात आले. रशियाच्या हल्ल्यानंतर कीव एअरपोर्ट रिकामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रशियानं यूक्रेनच्या ७९ लष्करी तळांना उद्ध्वस्त केल्याचं समोर आलं आहे.

यूक्रेनमध्ये सर्वसामान्य लोकांनाही शस्त्र दिली

यूक्रेननं रशियाशी लढण्यासाठी सर्व सामान्य लोकांनाही शस्त्र दिली आहेत. कीव मीडियानुसार, जवळपास १० हजार असॉल्ट रायफल सर्वसामान्यांना दिली आहेत. आतापर्यंत ५ रशियन जेटला मारलं आहे. ज्यात २ सुखोई यांचाही समावेश आहे. त्याशिवाय ५० रशियन सैन्याला ठार केले तर २५ सैनिकांनी सरेंडर केले आहे. काही रशियन टँकही उद्ध्वस्त केल्याचं यूक्रेननं म्हटलं आहे.

रशियाच्या शहरांमध्ये निदर्शने सुरू

यूक्रेनवर हल्ला केल्यानंतर आता रशियाच्या शहरांमध्येही युद्धाच्या विरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. यावेळी नागरिकांनी No War नारे लावले आहेत. पोलिसांनी शेकडो नागरिकांना ताब्यात घेतले आहे. रशियन पोलिसांनी आतापर्यंत युद्धाचा विरोध करणाऱ्या १७०० नागरिकांना अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.