दिवसेंदिवस वृत्तपत्रावरील विश्वासार्हता अधिक वाढणार

रोटरी क्लब ऑफ जळगावतर्फे आयोजित ‘माध्यमांपुढील आव्हाने’ या चर्चासत्रात सर्व संपादकांचे एकमत

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

रोटरी क्लब ऑफ जळगावतर्फे स्थानिक वृत्त संस्थांच्या निवडक संपादकांच्या सहभागात ‘माध्यमांपुढील आव्हाने’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात वृत्तपत्रासमोरील विविध आव्हानांवर स्थानिक वृत्त संस्थांच्या सदस्यांनी आपापली मते मांडली.
दरम्यान दिवसेंदिवस वृत्तपत्रावरील विश्वासार्हता अधिक वाढणार असल्याचा सूर सर्व संपादकांनी घेतला. तसेच सोशल मीडियावरील मधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या अतिक्रमणामुळे काय खोटे काय खरे, हे भविष्यात समजणे कठीण असणार असल्याचे मतही व्यक्त केले गेले.
यावेळी मोठ्या स्वरूपातील दैनिक देखील मोठ्या आव्हानांना तोंड देत आहे. तरी त्यांचा खप पूर्ववत करण्यात 80 टक्के पेक्षा अधिक यश आले असल्याचे मत रवी टाले यांनी व्यक्त केले. तसेच प्रत्येक गल्लीत एक चैनल, प्रत्येक अपारमेंट मध्ये एक संपादक आणि प्रत्येक घरात एक पत्रकार अशी स्थिती असून, फक्त प्रिंटच नाही तर सोशल मीडियाला सुद्धा फार मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे, अशी वस्तुस्थिती शेखर पाटील यांनी व्यक्त केली.
जळगाव शहरातील समस्यांचे आव्हान राजकारण्यांसमवेत जरी प्रसार माध्यमांपुढे दिसत असले, तरी ही समस्या फक्त जळगाव पुरती मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्राची सारखीच अवस्था असल्याचे मत दीपक पटावे यांनी व्यक्त केले. तसेच कोणत्याही समस्यांना वाचा फोडणारी बातमी देणे म्हणजे काहींच्या दृष्टीने निगेटिव्ह बातमी असते, जर असे असेल तर मग सकारात्मक बातमी म्हणजे नेमकी कशी द्यायची? असा सवाल मनोज बारी यांनी उपस्थित केला.
यावेळी सुभाष गोळे सर यांनी संपादकीय वितरण आणि जाहिरात विभागाचे आव्हान सांभाळणे म्हणजे खरे आव्हान असून, ही व्यवस्थापनाची खरी कसोटी असते, असे मत व्यक्त केले. तर दोन पेक्षा अधिक व्यवसाय केल्याशिवाय वृत्तपत्राचा व्यवसाय कोणीच यशस्वी करू शकणार नाही, अशी भूमिका प्रमोद बराटे यांनी व्यक्त केली.
चर्चासत्राचे अध्यक्षपदी श्री. मनोज जोशी हे होते. या विशेष चर्चासत्रात लोकमततर्फे रवी टाले, दिव्य मराठीतर्फे दीपक पटावे, लोकशाहीतर्फे सुभाष गोळेसर, साईमततर्फे प्रमोद बऱ्हाटे, लाईव्ह ट्रेंडतर्फे शेखर पाटील, देशोन्नतीतर्फे मनोज बारी आदी संपादक सदस्य सहभागी होते.
चर्चासत्राचे सूत्रसंचालन असिफ मेमन आणि राजेश यावलकर यांनी केले. प्रास्ताविक ज्येष्ठ सदस्य डॉ. जयंत जहागीरदार यांनी तर आभार सुबोध सराफ यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.