नवी दिल्ली ;- रशिया-युक्रेन युद्ध जवळपास दोन वर्षांपासून सुरू आहे. दरम्यान, रशियाने क्रिमियामध्ये युक्रेनचे १६ ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. जूनमध्ये सुरू केलेल्या प्रत्युत्तराच्या हल्ल्याचा भाग म्हणून युक्रेनने द्वीपकल्पातील आणि आसपासच्या रशियन लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले वाढवले आहेत.
रशियाने याविषयी एक निवेदन जारी केले आहे. त्यात,”त्यांनी देशाच्या दक्षिणेकडील आणि लगतच्या क्रिमियन द्वीपकल्पात हवेत 16 युक्रेनियन ड्रोन नष्ट केले असल्याचे म्हटले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने, “गुरुवारी रात्री हवाई ड्रोनचा वापर करून रशियाच्या हद्दीत हल्ला करण्याचा कट रचला जात होता, मात्र रशियाने युक्रेनचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे.” असे सांगितले आहे.
पुढे संरक्षण मंत्रालयाने, “आमच्या हवाई संरक्षण यंत्रणेने नष्ट केलेल्या ड्रोनपैकी 13 क्रिमियन द्वीपकल्पावर हल्ला करणार होते, तर तीन व्होल्गोग्राड प्रदेशातून जात होते.” असे म्हटले आहे.
2014 मध्ये रशियाने क्रिमियावर ताबा मिळवला आहे. आता युक्रेनला हा भाग पुन्हा आपल्या ताब्यात घ्यायचा आहे. रशियाने या भागात ब्लॅक सी फ्लीट तैनात केल्यामुळे युक्रेनही या भागावर हल्ला करतो. याच भागातून रशिया आपल्या सैन्याला अन्न किंवा शस्त्रे पुरवतो.