आमदारकी कुठे, कशी वापरायची कळत नाही ? 

अजितदादांनी टिंगरेंना झापलं

0

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क 

पुण्याच्या कल्याणीनगर येथे घडलेल्या पोर्शे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात अजितदादा गटाचे आमदार सुनील टिंगरे यांचे नाव समोर आल्याने अजित पवारांसाठी मोठी अडचण निर्माण झाली. याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनील टिंगरे यांना झापल्याची माहिती आहे. आमदारकी कुठे आणि कशी वापरायची हे कळत नाही का, अशा शब्दांत अजित पवारांनी टिंगरे यांना सुनावले आहे. पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात टिंगरेच्या कृतीने अजित पवार तीव्र नाराज असल्याची माहिती आहे.

काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाची मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीला सुनील टिंगरे हे गैरहजर होते. त्यामुळे सुनील टिंगरे हे नेमके बैठकीला का गैरहजर राहिले याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे. आता अजित पवार यांनी सुनील टिंगरे यांना या प्रकरणावरून झापल्याची माहिती समोर येत आहे. पुणे हिट अँड रन प्रकरणात सुनील टिंगरे यांचे नाव येत असल्याने अजित पवार यांनी सुनील टिंगरे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘आमदारकी कशी आणि कुठे वापरायची हे कळते का?’ अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी सुनील टिंगरे यांना खडेबोल सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

पोर्शे प्रकरणात सुनील टिंगरे अडकले

पोर्शे अपघात झाल्यानंतर अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवालने सुनील टिंगरे यांना फोन केलेला त्यानंतर पहाटेच टिंगरे हे पोलिस ठाण्यात गेले होते. तसेच, त्यांनी अल्पवयीन आरोपीला पिझ्झा दिल्याचाही आरोप विरोधकांनी त्यांच्यावर केला होता. यावर सुनील टिंगरे यांनी स्पष्टीकरण देत मी पोलिसांवर कुठलाही दबाव आणला नसल्याचे सांगितले होते. पण, ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे ज्यांच्यावर अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप आहे, त्यांची नेमणूक करण्याची शिफारस ही टिंगरेंनीच केली होती, त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना यासंबंधी एक शिफारस पत्र दिले होते, ते देखील समोर आले. त्यानंतर याप्रकरणात टिंगरे यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली.

 

‘ती’ जागा हातातून जाणार?

त्यामुळे आता या घटनेचा थेट फटका हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बसताना दिसत आहे. सुनील टिंगरे यांचे नाव या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने अजितदादा गट अडचणीत आला आहे. त्यामुळे टिंगरेंचा विधानसभा मतदारसंघ हा अजितदादा गटाच्या हातातून जाण्याची भीती आहे. सुनील टिंगरे हे वडगाव शेरीचे आमदार आहेत. आता येत्या निवडणुकीत ही जागा अजितदादा गटाकडेच राहिल की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे.

 

सुनील टिंगरेंमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची गोची

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुनील टिंगरे यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळेस त्यांनी भाजपचे जगदीश मुळीक यांचा पराभव केला होता. मात्र त्यानंतर बदललेल्या राजकीय गणितांमध्ये आता महायुतीमध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळू शकतो. मात्र, सुनील टिंगरे यांच्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसची गोची झाली आहे. त्यामुळे अजित पवार गटाला हातचा मतदार संघ गमवावा लागू शकतो. दुसरीकडे भाजपने या प्रकरणामध्ये आपल्या मित्र पक्षाचा आमदार अडकला असला तरी त्याची बाजू सावरण्यासाठी कुठली प्रतिक्रिया किंवा कुठलाही पाऊल उचलला नाही. त्यामुळे भाजपने वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये सेफ गेम खेळत असल्याचे दिसत आहे. खासदारकीची संधी हुकल्यानंतर जगदीश मुळीक हे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. अशातच आता भाजपला या मतदारसंघावर दावा करण्याची नामी संधी चालून आली असल्याचे चित्र दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.