निवडणुकीसाठी साडेसहा हजार पोलिसांचा राहणार बंदोबस्त !

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची माहिती : लोकशाही समूहाला दिली भेट

0

जळगाव ;- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी तब्बल साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार असून कोंम्बिग ऑपरेशनच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली. ‘लोकशाही’ समूहाला त्यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संचालक राजेश यावलकर यांनी शाल, स्मृतीचिन्ह देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी व्यवस्थापक सुभाष गोळेसर, वरिष्ठ उपसंपादक दीपक कुळकर्णी, जाहिरात व्यवस्थापक विवेक कुळकर्णी, सुरेश सानप, आनंद गोरे, अमोल पाटील व सहकारी उपस्थित होते.

डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील मतदान, मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशसन सज्ज असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गस्ती पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. मध्यंतरीच्या काळात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी धडक पाऊले उचलली गेली असून तब्बल 32 गावठी कट्टे, मध्यप्रदेशातील अवैध दारु, ग्ज यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील तीन हजार 200 बुथ, स्टाँग रुमवर सीसीटीव्ही कॅमेराची नजर राहणार आहे. जिल्ह्यातील तीन हजार 500 आणि परजिल्ह्यातील दोन हजार 500 असा अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. त्यांच्यासोबत तीनशे एसआरपीचे जवान, तीनशे सीएफएचे जवानही तैनात राहणार आहेत. संवेदनशील मतदार केंद्रावर विशेष काळजी घेतली जाणार असून त्या भागातील पाच वर्षांपूर्वीचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना सूचना करण्यात आली असून त्यांच्यावर प्रशासनाचे बारीक लक्ष राहणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविणे, आक्षेपार्ह पोस्ट करणे यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी स्वतंत्र्य व्यवस्था करण्यात आली आहे.

नाकाबंदीतून तस्कारांना लावणार लगाम
जिल्ह्यात सात ठिकाणी कायमस्वरुपीची नाकाबंदी करण्यात आली असून मध्यप्रदेश हद्दीतील बडवाणी, खरगोन व बऱ्हाणपूर रस्त्यावर कटाक्षाने नाकाबंदी करण्यात आलेली आहे. मध्यप्रदेश व महाराष्ट्र पोलिसांची संयुक्त बैठक घेण्यात आली असून त्यांनीही आपल्या क्षेत्रात नाकाबंदी केलेली आहे. या नाकाबंदीस्थळी वरिष्ठ अधिकारी देखील भेट देणार असून यातून दारु, पैसा तस्करांना लगाम लावण्यात येणार आहे.

प्रचार सभांवर लक्ष
निवडणुकी दरम्यान आयोजित प्रचार सभांमध्ये प्रक्षोभक्ष्य भाषणे होत असल्याने त्यातून सामाजिक शांतात धोक्यात येवू शकते. यासाठी प्रशासनाकडून विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या मार्फत व्हिडीओ शुटींगही करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार प्रक्षोभक्ष्य भाषण करणाऱ्या व्यक्तींवर आता थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. एकंदरीत जिल्ह्यातील निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले असून गुन्हेगारीला आळा घालण्यात येणार आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.