“पठाण” चित्रपटाचा आणखी नवा वाद

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

बऱ्याच दिवसापासून पठाण (Pathan) चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. काल चित्रपट रिलीज झाला खरा पण, उत्तरप्रदेशमधल्या बरेलीमध्ये शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ या चित्रपटावरून बुधवारी रात्री थिएटरमध्ये जोरदार हंगामा झाला. हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये आलेल्या काही लोकांनी मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग करण्यात सुरुवात केली. जेव्हा थिएटरच्या कर्मचाऱ्यांना ही गोष्ट समजली आणि त्यांनी संबंधितांना थांबविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा व्हिडीओ शूट करणाऱ्यांनी शिवीगाळ आणि मारहाण करण्यात सुरुवात केली. या वादानंतर स्पष्ट झालं की चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ या गाण्यावरून केलेल्या अश्लील शेरेबाजीमुळे हा वाद सुरू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन काही जणांना ताब्यात घेतलं.

इज्जतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फिनिक्स थिएटरमध्ये बुधवारी रात्री पठाण चित्रपटाचा शो लावण्यात आला होता. या शोदरम्यान काही जण त्यांच्या मोबाइलमध्ये चित्रपटाची रेकॉर्डिंग करत होते. याची माहिती मिळताच थिएटर कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर दोन गटांमध्ये तुफान मारहाण झाली. व्हिडीओ शूट कऱणाऱ्यांनी आधी थिएटर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर बाऊन्सर थिएटरमध्ये आले आणि त्यांनी व्हिडीओ शूट करणाऱ्यांना मारलं. हा वाद वाढल्यानंतर व्हिडीओ शूट करणाऱ्यांनी अश्लील शेरेबाजीचा आरोप केला आहे. चित्रपटात जेव्हा दीपिका पदुकोणचं (Deepika Padukone) बेशर्म रंग हे गाणं सुरू झालं, तेव्हा काही लोकांनी आक्षेपार्ह शेरेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याचा दुसऱ्या गटाने विरोध केला आणि त्यांनी व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. हा भांडण वाढल्यानंतर दोन गटांमध्ये मारहाण झाली.

थिएटरमध्ये सुरू असलेल्या या गोंधळाविषयी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि काही जणांना ताब्यात घेतलं. त्यानंतर पुन्हा पठाणचा शो सुरू करण्यात आला. थिएटरमध्ये मारहाण होत असताना काहींनी त्याचाही व्हिडीओ शूट करत सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. पोलिसांकडून थिएटरमधील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.