मानवी जीवनाच्या निरोगी पंचकोषाकरिता पंचप्राण साधना

0

लोकशाही विशेष लेख

 

सध्याच्या भोगवादी युगात मनुष्याचे आयुर्मान घटले आहे. मानवी शरीरात नवनवीन रोग उत्पन्न होत आहे. मानवाची रोगप्रतिकारक शक्ती दिवसेंदिवस क्षीण होते आहे. म्हणून सद्यस्थित सर्व प्रकारची आरोग्य संपन्नता मिळविणे हेच मानवी जीवनाचे प्राथमिक लक्ष बनलेले आहे. मानवाचे अस्तित्व हे केवळ शारीरिक पातळीवरच अवलंबून नाही. तर मानवी जीवनाच्या आणि त्याच्या अस्तित्वाच्या अनेक पातळ्या आहेत. मनुष्य जीवनाच्या या पातळ्यांना कोष म्हटले गेले आहे. माणसाला शरीराबरोबरच मन आणि बुद्धी सुद्धा मिळालेली आहे. शरीर, मन आणि बुद्धी याचं संचलन व्यवस्थित व्हावे याकरिता प्राणाची आवश्यकता भासते. तसेच मानवी शरीराच्या पाच पातळ्या म्हणजे पाच कोष आहेत. यात अन्नमय कोष म्हणजे स्थूल शरीर, प्राणमय कोष (पंचप्राण आणि उपप्राण), मनोमय कोष, विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष आदी पंचकोष आहेत. हे सर्व कोष पूर्णत्वाने विकसित होणे, ते निर्दोष राहणे म्हणजे आरोग्य होय.

मानवाच्या प्राथमिक गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा या बरोबरच आरोग्य देखील महत्वाचे आहे. संपूर्ण आरोग्य म्हणजे काय? स्वस्थ व्यक्ती कोणाला म्हणावे? अशा आरोग्याची व्याख्या आपणास विविध ग्रंथांमध्ये आढळून येईल. चरक संहितेमधील आरोग्याची व्याख्या सुखसज्ञंक आरोग्यं विकारोदु:खमेवच् । अशी केली आहे. अर्थात सुख म्हणजे आरोग्य आणि दुःख म्हणजे विकार होय. याच चरक संहितेमध्ये स्वस्थ व्यक्तीची लक्षणे दिली आहे.
त्यात म्हटले आहे की, समदोष: समाग्निश्च समधातु मलक्रिया: । प्रसन्नात्मेंद्रियमनः स्वस्थ इति अभिधियते ।। अर्थात ज्या व्यक्तीमध्ये त्रिदोष (वात, पित्त आणि कफ), अग्नी (भूक), सप्तधातू (रस, रक्त, मास, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र), मल (मुत्र, पुरिष आणि श्वेत) हे साम्य अवस्थेत असतील तर आत्मा, मन आणि इंद्रिये हे प्रसन्न असतात. म्हणजे ज्ञान ग्रहण करण्यास समर्थ असतात. अशा व्यक्तीलाच स्वस्थ व्यक्ती म्हणतात. तर अष्टांग संग्रहात विकारो धातूवैषम्यं धातूसाम्यं अरोगता । अशी व्याख्या केली आहे, म्हणजे शरीरातील धातूमध्ये विषमता निर्माण झाल्यास व्याधी उत्त्पन्न होतात आणि साम्य निर्माण झाल्यास आरोग्य प्राप्त होते.

मनुष्य जीवनात जे पंचकोष सांगितले आहे त्यात असंतुलन निर्माण झाल्यास विकार जडतात. विकार हे वरून खाली अर्थात आनंदमय कोषापासून ते अन्नमय कोष यापर्यंत येतात याचा अर्थ मनुष्य आनंदी नसेल तर त्याचा परिणाम ज्ञानमय कोषावर होतो असे करत करत व्याधी अन्नमय कोषापर्यंत येते. म्हणून आधी विकार मनाला मग शरीराला असे म्हटले जाते. म्हणून उत्तम आरोग्य प्राप्त करण्यासाठी पंचकोशांवर साधना करणे अपेक्षित आहे.
शारीरिक आणि मानसिक संतुलन प्रस्तापित करणे हे प्राणमय कोषाचे कार्य आहे. श्वासाला नियंत्रित करून आपण प्राणशक्तीला नियंत्रित करू शकतो आणि प्राण नियंत्रित झाला की शरीर आणि मनात संतुलन निर्माण होते. शरीरात पाच मुख्य प्राण आणि पाच उपप्राण आहेत. हे पंचप्राण मानवी शरीराला लाभलेली अमुल्य देणगी आहे. आपल्या देहातील प्रत्येक प्राणाचे कार्य भिन्न भिन्न आहे. हे मुख्य पंचप्राण म्हणजे १) प्राण २) अपान ३) व्यान ४) उदान ५) समान होय.
हृदय हे प्राण वायूचे स्थान असून या वायूमुळेच व्यक्ती श्वासोच्छवास करू शकतो. श्वास उच्छ्वासाची प्रेरणा प्राण या वायूमुळे मिळते. या वायूमुळेच ऑक्सिजन शरीरातील सर्व पेशींपर्यंत पोहचविला जातो. दुसरा अपान हा वायु मोठया आतडयात राहतो. मलमुत्र विसर्जनाची प्रेरणा अपान वायुमुळे होते आणि व्यक्ती मलमूत्राचे विसर्जन करतो. तिसरा आणि महत्त्वाचा वायू आहे व्यान हा सर्व शरीर व्यापून आहे. व्यान वायूत असंतुलन निर्माण झाल्यास शरीरात वात रोगाची उत्पत्ती होते. चौथा वायू आहे उदान, हा कंठात राहतो व अन्नरसाचे विभाजन करतो. पाचवा वायू म्हणजे समान वायू याचे स्थान नाभी कमलात असून हा वायू सर्व नाडयांना अन्नरस पुरवितो.

पंचप्राणांचे उपप्राण आहेत आणि त्यांचे देखील विविध कार्य शरीरात सुरु असते. या उपप्राणांमध्ये १) नाग २) कूर्म ३) कृकल ४) देवदत्त ५) धनंजय आदी वायू येतात. यातील पाहिला उपप्राण नाग हा वायु ढेकर निर्माण करतो व शरीरातील अशुद्ध तत्वे बाहेर टाकतो. दुसरा उपप्राण कूर्म होय हा वायु पापण्यांची उघडझाप करतो. तिसरा उपप्राण कृकल आहे हा वायु शिंक व खोकला निर्माण करतो. चौथा उपप्राण देवदत्त हा वायु जांभई निर्माण करतो. तर मनुष्यातील आत्मा देह त्याग केल्यानंतर देखील शरीरात राहणारा पाचवा आणि महत्त्वाचा उपप्राण धनंजय होय. हा वायु मृत्यूनंतर देखील आपल्या शरीरात राहतो यामुळे वातावरणातील पिशाच्चे मृत शरीरात शिरत नाहीत. याकरिता मृत देहास अग्निसंस्कार करणे शास्त्रीयदृष्ट्या अतिशय चांगले आहे. मृत देहावर अग्नीसंस्कार झाल्याने धनंजय वायू शरीरात अडकून राहत नाही व जीवात्म्याचीही बंधनातून सुटका होते. निरामय आरोग्यासाठी आणि निरोगी पंचकोषांकरिता पंचप्राण आणि उपप्राण यांचे कार्य आणि स्थान यांची माहिती असणे आवश्यक आहे. जेणे करून योगाभ्यास करते वेळी प्राणायामाच्या माध्यमातून संबंधित प्राण आणि उपप्राणाला नियंत्रित करून साधक विकारातून मुक्ती प्राप्त करू घेऊ शकतो. पंचतत्व, पंचवायू संतुलित करणे आणि त्रिदोष समान ठेवण्यासाठी विशिष्ट सधना पद्धती अवलंबविणे हितकारक ठरते.

प्रा. कृणाल दिलीप महाजन
सहायक प्राध्यापक
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक
९२०९२५०५५५

Leave A Reply

Your email address will not be published.