नऊपद ओळी आराधना विसरू नये…

0

 

प्रवचन सारांश

नऊपद ओळी आराधनेचा आजचा तिसरा दिवस आहे. या पवित्र दिवसांमध्ये नऊपद ओळी आराधना आणि आयंबील करायला विसरू नका. ही साधना केल्याने अनेक फायदे होतात असे आवाहन डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य पू. जयपुरंदर मुनी यांनी आजच्या प्रवचनात केले.

श्रीपाल चरित्राच्या पुढील भागाचे वाचन आणि कथा आज सांगितली गेली. श्रीपाल आणि मैनासुंदरी यांचा विवाह झाल्यावर आपल्या कोडी शरीराबद्दल श्रीपाल यांना वाईट वाटते. इतकी सुंदर सुशील मैनासुंदरी आहे. आपल्याला कोड आहे परंतु आपण तिला दुःखा शिवाय काही देऊ शकत नाही याचे शल्य बोचत असते. माझ्यासाठी तुझे जीवन धोक्यात आणू नकोस, तू कुण्या चांगल्या व्यक्तीशी लग्न करून सुखी हो असे श्रीपाल सुचवितो. घरंदाज व कुल, शील जपणाऱ्या स्त्रिया आपल्या जोडिदाराशिवाय दुसरा विचार करत नाहीत. मी तुमच्या सोबतच असेल असे सांगते. मैनासुंदरी ही धार्मिक वृत्तीची असते. आपल्या पतीला ती धर्माशी जोडावे म्हणून साधू संतांच्या दर्शनासाठी घेऊन जाते. साधुसंतांना मैनासुंदरी विनंती करते की, माझ्या पतीचे कोड बरे व्हावे यासाठी काही उपाय सांगा. त्यावर आयंबील ओळी करण्याचा उपाय साधु संत सांगतात. दोघे पती-पत्नी मनोभावे आयंबील करतात. पहिल्या आयंबीलला श्रीपालचा रोग बरा होतो व नवव्या आयंबीलला पूर्णपणे बरा होऊन त्याची काया सोन्यासारखी होते. आयंबील साधनेमुळे श्रीपाल रोगमुक्त झाला. मी रोग मुक्त झालो तसे मी ज्यांच्या आश्रयाला राहिलो त्या 700 कोडींचा देखील रोग बरा व्हावा ही सद्भावना ठेवली. साधु संतांना श्रीपाल यांनी विनंती केली की माझ्या सोबतच्या 700 कोडींचा रोग पूर्ण बरा व्हावा ह्यासाठीपण उपाय योजना सांगा. त्यांचा रोग बरा व्हावा म्हणून उपाय सुचविला जातो.

मैनासुंदरी हिला तिची आई राणी रुपसुंदरी रस्त्यात भेटते. आपल्या मुलीने कोडी पतीला सोडून पर पुरुषाला जवळ केले ह्या गोष्टीचे वाईट वाटले. मैनासुंदरीने आपल्या आईला आयंबील ओलीमुळे आपल्या जीवनात झालेला बदल सांगितला. मैनासुंदरीच्या वडिलांना आपली चूक ध्यानात आली. मुलगी व जावई यांना सन्मानाने आपल्या राज्यात बोलावले. एखाद्या शब्दामुळे जीवनात परिवर्तन घडते तसे काहीसे श्रीपाल यांच्या जीवनात घडले. उद्यानात ते बसले होते व नगरातील एका कन्येने आईला श्रीपाल यांच्याबद्दल विचारणा केली. श्रीपाल यांना ऐकू जाईल अशा आवाजात त्या कन्येची आई श्रीपाल यांची ओळख मुलीला सांगते की, हे  आपल्या राजाचे जावई आहेत. हे शब्द ऐकुन श्रीपाल यांच्या आत्मसन्मानाला जणू ठेच पोहोचली. ते विचार करू लागले की, आपली स्वतंत्र ओळख नाही. आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी आपले स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करायला हवे. घरी आल्यावर श्रीपाल यांचा चेहरा उतरलेला दिसला. सर्व हकीगत आपल्या पत्नीला सांगिली व व्यापार करण्यासाठी आपण परदेशी जाणार आहोत असे सांगितले. आपण देखील येणार असा हट्ट मैनासुंदरी पती श्रीपाल यांच्याकडे धरते परंतु आपण 12 वर्षानंतर नक्की भेटू असे वचन आपल्या पत्नीला देऊन श्रीपाल व्यापारासाठी निघून जातो. मैनासुंदरी देखील होकार देते परंतु एक अट ती आपल्या पतीसमोर ठेवते. तुम्ही जोवर येत नाहीत तोवर माझी एकासना साधना करीन. तुम्ही जगात कुठेही असा तुम्ही नऊपद ओलीची साधना विसरू नको, आयंबील करा असे आवर्जून सांगितले. पुढच्या भागात श्रीपाल व मैनासुंदरी यांच्या जीवनात काय काय घडते? श्रीपाल यांच्या जीवनात अजून काय नवीन घडते हे जाण्यासाठी पुढच्या प्रवचनाचा अवश्य लाभ घ्यावा.

———□■□■————
पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची मेरी भावनाही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर

Leave A Reply

Your email address will not be published.