ज्येष्ठ नागरिक संघातर्फे गुणवंत महिलांचा गौरव

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शंभर पुरुष एकत्र येऊ शकतात पण दोन महिला एकत्र आल्या की भांडतात हा समाजातील गैरसमज पुसून रोज महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि एकीने दुसरीचा सन्मान केला तर समाजात सौहार्दाचे वातावरण निर्माण होऊ शकते, असे विचार स्त्री सन्मान महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्षा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. रेखाताई बोऱ्हाडे यांनी बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला दिन कार्यक्रमात व्यक्त केले. रुचिरा दिघे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेवा सामाजिक शिक्षण संस्था, बोरीवली पूर्व या सभागृहात महिन्याच्या शेवटच्या बुधवारी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे महिला दिन साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुण्या या नात्याने रेखाताई बोऱ्हाडे या मार्गदर्शन करीत होत्या. कोविड १९ मुळे दोन वर्षे कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता परंतु या दोन वर्षानंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि सभागृह तुडुंब भरले होते. विशेष म्हणजे विजय कुवळेकर, कमलाकर  अजिंक्य यांच्या सह ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

केवळ सव्वीसाव्या वर्षी विमान चालक (पायलट) म्हणून सुमारे सत्तावीस देश फिरुन विक्रम करणाऱ्या आरोही पंडित, महिला रिक्षाचालक मनीषा चव्हाण म्हात्रे, कोविड योद्धा परिचारिका सुवर्णा ठाकूर आणि समूपदेशक प्रा. ऋता खर्शीकर तसेच साना परब यांचा रेखाताई बोऱ्हाडे यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन समाजातील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी योगदान दिल्याबद्दल पल्लवी शेडगे यांचेही कौतुक करण्यात आले.

या साऱ्या गौरवमूर्तींनी आपापले अनुभव कथन केले. डॉ. सुगंधा देवधर यांनी मनोगत व्यक्त केले. गजानन बर्वे यांनी स्वागत गीत व पसायदान म्हटले. मोहन शेजवलकर यांनी मध्यंतर गीत तसेच पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुभाष लाड यांनी गौरव मूर्तींचा परिचय करून दिला. श्रीपाद परांजपे यांनी खुमासदार सूत्रसंचालन केले. मनोहर वठारकर यांनी आभार प्रदर्शन केले. सर्वच उपस्थितांना मंदा साळसकर यांच्या सौजन्याने अल्पोपहार देण्यात आला

Leave A Reply

Your email address will not be published.