खाद्यसंस्कृती; झणझणीत कोल्हापूरी स्पेशल मिसळ

0

लोकशाही विशेष लेख

नुसता फोटो पाहूनच तोंडाला पाणी सुटलं ना….. आज आपण झणझणीत कोल्हापूरी मिसळ बनवणार आहोत..

मिसळचा (Misal) इतिहास जर पहायचा झाला तर ती महाराष्ट्रातच उदयास आलेली असून त्याबाबत अनेक किस्से वाचनात येतात. अलीकडेच एक लेख वाचला होता. छ. शाहू महाराजांच्या काळात महाराजांना भूक लागली होती. आणि त्यांच्या आचारींनी त्यांना स्वयंपाक घरात जेवण काही नसल्याने जे काही पदार्थ शिल्लक होते ते एकत्रित करून असा एक नवीन पदार्थ खाऊ घातला. आणि तो महाराजांना इतका आवडला की त्याची वारंवार मागणी होऊ लागली. (किस्सा मोठा असल्याने थोडक्यात मांडला आहे.) आणि तेव्हांपासून मिसळचा शोध लागला, आणि ही स्पेशल मिसळ प्रचलित झाली.

तसे पाहता आता प्रत्येक ठिकाणी आपापल्या शहर/गावांच्या नावांनी स्पेशल मिसळ मिळत आहे, जसे पुणेरी मिसळ, नाशिकची मिसळ, नागपूरी मिसळ इ…

आजकाल तर मिसळचा थाटच न्यारा पहायला मिळत आहे. कुठे पोहे घालून, तर कुठे थाली सजवलेल्या स्वरुपात अशा किती तरी नावीन्यपूर्ण प्रकारात मिळणारी ही स्पेशल मिसळ बनवूया माझ्या कोल्हापूरी पद्धतीने..

साहित्य
१-१/२ वाटी मटकी, ३ बटाटे, ४ कांदे, ३ टोमॅटो, ओला नारळ, आले छोटा तुकडा, ७-८ पाकळ्या लसूण, हिरवी मिरची, कोल्हापूरी तिखट मसाला, ३/४ लवंगा, १/२ मीरे, १ दालचीनी, कडीपत्ता, जीरे-मोहरी, तेल, कोथिंबीर, लिंबू, ब्रेडचे स्लाईस, फरसाण.

कृती

१. प्रथम आले लसूण पेस्ट करून घ्यावी, ओलं खोबरं त्यामध्ये जीरे, लवंग, मीरं, दालचीनी एकत्र मिक्सर मधून बारीक वाटण  करून घ्यावे. कांदा उभा चिरून घ्यावा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.
२. १/२ चमचा तेल गरम करून मटकी चांगली परतून घेऊन १-१/२ ग्लास पाणी घालून ती कुकरमध्ये २ शिटीमध्ये उकडून घ्यावी आणि त्याचबरोबर बटाटे वेगळे उकडून घ्यावे, बटाट्याची साले काढून घ्यावी. व बटाट्याची जास्त कांदा घालून हिरव्या मिरच्या-आले-लसूणचे वाटण करून भाजी बनवून घ्यावी.
३. एका पातेल्यात तेल गरम करुन त्यात जिरं – मोहरी – कडीपत्ता फोडणीला टाकावे, उभा चिरलेला कांदा टाकून लालसर रंगावर परतून घ्यावा, नंतर टोमॅटो घालून तो चांगला विरघळेपर्यंत परतून घ्यावा.
४. नंतर आले लसूण पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे, त्यानंतर वरील खोबऱ्याचे वाटण घालून चांगले एकजीव परतून घ्यावे या सर्व मिश्रणाला तेल सुटेपर्यंत परतावे. कोल्हापूरी तिखट मसाला व मीठ, हळद घालून चांगले परतून घ्यावे.
५. आता यामध्ये तयार केलेली बटाट्याची भाजी घालावी आणि शिजवून घेतलेली मटकी घालून चांगले मिक्स करुन चांगली रस्सेदार मिसळ कट सुटेपर्यंत उकळी येऊ द्यावी.

तयार मिसळचा रस्सा खाण्यासाठी घेताना एका प्लेटमध्ये फरसाण घेवून हा कटाचा गरमागरम रस्सा त्यावर ओतून वरून कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर व लिंबू आणि यासोबत मिळणारा कोल्हापूरी पावाची स्लाइस असेल तर चवच न्यारी..
व्वा काय बेत झालाय….

अपर्णा स्वप्निल कांबळे/नांगरे
९८९२१३८१३२
पत्रकार/फूड ब्लॉगर

Leave A Reply

Your email address will not be published.