इस्रो अध्यक्षांची जीवनकथा: प्रा.सतिश धवन

0

लोकशाही विशेष लेख

भारतीय अंतराळ क्षेत्राला प्रतिभाशाली नेतृत्व देणारा शास्त्रज्ञ म्हणून प्रा. सतिश धवन (Prof. Satish Dhawan) यांची ओळख आहे. २५ सप्टेंबर १९२० रोजी श्रीनगर येथे प्रा. सतिश धवन यांचा जन्म झाला. प्रा. सतिश धवन यांनी लाहोर मधील पंजाब विद्यापीठातून भौतिकशास्त्र, गणित आणि यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. त्यांनी पंजाब विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात देखील पदव्युत्तर पदवी घेतली होती. पुढील अभ्यासासाठी ते अमेरिकेत गेले.

त्यांनी मिनेसोटा विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये मास्टर ऑफ सायन्स आणि कॅलिफोर्निया इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमधुन एरोनॉटिकल इंजिनीअरिंग केले. पुढे त्यांनी एरोस्पेस अभियांत्रिकी आणि गणिता मध्ये दुहेरी पीएचडी देखील मिळवली. शिक्षणाची प्रचंड गोडी व ध्यास असला की ज्ञानार्जन हेच आयुष्याचेही ध्येय बनते याचेच एक उदाहरण म्हणजे प्रा. सतीश धवन होय. १९५१ मध्ये, प्रा. धवन हे इंडियन इन्स्टिटयुट ऑफ सायन्स (IISc) बेंगळुरु येथे एक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. एका दशकानंतर त्यांनी स्वकर्तृत्वावर इंडियन इंन्स्टिटयुट ऑफ सायन्सचे डायरेक्टर होण्याचा मान मिळवला.

प्रा. सतीश धवन यांना भारतातील प्रायोगिक Fluid dynamics च्या संशोधनाचे जनक मानले जाते. भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाच्या वाटचालीत देखील प्रा. सतीश धवन यांचे महत्त्वाचे योगदान होते. वयाच्या ५२ व्या वर्षी, १९७२ मध्ये डॉ. सतीश धवन यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) तिसरे अध्यक्ष म्हणून पदभार स्विकारला. सलग बारा वर्षे त्यांनी इस्रोचे अध्यक्ष पद भूषवले. ते अंतराळ विभागात भारत सरकारचे सचिव देखील होते. त्यांच्या नेतृत्वात भारताने आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट प्रक्षेपित केला. प्रा. सतीश धवन यांनी रिमोट सेन्सिंग आणि उपग्रह संप्रेषणाचे प्रयोग केले, जे ग्रामीण शिक्षणासाठी उपयुक्त ठरले. तसेच INSAT – दुरसंचार उपग्रह, IRS – दुरसंवेद उपग्रह आणि PSLV – Polar Satellite Launch Vehicle यासारखे प्रकल्प देखील प्रा. धवन यांच्या प्रयत्नांनी यशस्वी झाले.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) मध्ये भारताचा पहिला सुपर सॉनिक पवन बोगदा उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. घर्षणजन्य प्रेरणा (फ्रिक्शन ड्रॅग) मोजण्याची सोपी पद्धत त्यांनी शोधली. ‘चंद्रयान १’ ला अंतराळात प्रक्षेपित करण्याचे स्वप्न विक्रम साराभाई यांनी बघितले तर त्याला प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रा. धवन यांनी अपार कष्ट घेतले. या प्रकल्पाला त्यांनी वेगवेगळ्या विभागातील ज्ञानी लोकांच्या सहकार्याने मूर्त स्वरूप दिले. जेव्हा हे प्रक्षेपण अयशस्वी ठरले तेव्हा एक टीम लीडर म्हणून अपयशाची संपूर्ण जबाबदारी मान्य करून आगामी मोहीम जबाबदारीने पूर्णत्वास नेण्याची ग्वाही प्रा. धवन यांनी दिली. यानंतर १९ जुलै १९८० रोजी त्यांच्या नेतृत्वाखाली ‘रोहिणी’ उपग्रहाला प्रक्षेपण यानाद्वारे यशस्वीरित्या भ्रमण कक्षेत नेऊन सोडले. त्यांच्याच अथक प्रयत्नांमुळे भारत हा रशिया, अमेरिका, चीन या देशांप्रमाणे अंतराळाला आपल्या कवेत सामावून घेणाऱ्या देशांपैकी एक झाला.

कर्तव्यदक्ष अध्यापक, संशोधक, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अभियंता, व्यापक दृष्टीकोन असलेला निष्ठावान कार्यक्षम नेता या गुणांमुळे प्रा. सतीश धवन हे ज्या क्षेत्रात शिरले, त्यात त्यांनी अमुलाग्र बदल घडवले. इस्त्रोचे अध्यक्ष म्हणून अतुलनीय कामगिरी केलेल्या एक तपाच्या सेवेचा गौरव व प्रा. धवन यांच्या प्रतिभाशाली कर्तृत्वाचा सन्मान म्हणून १९७१ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’, १९८१ मध्ये ‘पद्मविभूषण’ आणि १९९९ मध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

प्रा. सतीश धवन यांनी ३ जानेवारी २००२ रोजी बेंगळुरू येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्युनंतर, आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण केंद्राचे नाव बदलून सतीश धवन अंतराळ केंद्र असे करण्यात आले. तसेच IIT Ropar येथील यांत्रिक अभियांत्रिकी इमारत विभागाला सतीश धवन ब्लॉक असे नाव दिले.

कोणत्याही क्षेत्रात कार्य करणारी टीम ही एका रात्रीत यशस्वी होत नाही. तिच्या यशामागे कैक हात न दमता परिश्रम करत असतात. जितके महत्वाचे कष्ट असतात तितक्याच, किंबहुना अधिक महत्त्वाचे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तिचे नियोजन असते. भारताला अंतराळ तंत्रज्ञानात प्रगती पथावर अग्रेसर करण्यात डॉ. सतीश धवन यांची मोलाची भूमिका आहे. त्यांच्या या प्रेरणादायी कारकिर्दीवरुन हे थोर व्यक्तिमत्व सदैव स्मरणात राहिल यात शंका नाही.

कु. गायत्री अशोक शिंदे
केसीई बी.एड. कॉलेज
जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.