चार महिन्यांनी देवरांनी गुपित फोडले !

काँग्रेस का सोडली? : कारण सांगताना ‘हर्षवर्धन’ पॅटर्न

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा माझ्या हातातून काढून घेऊ नका असे मी काँग्रेसमध्ये असताना काँग्रेस नेतृत्वाला सांगत होतो, मात्र उद्धव ठाकरे यांनी दबाव टाकल्याने हा मतदारसंघ त्यांच्या ताब्यात गेला. त्यानंतर मी काँग्रेसला शुभेच्छा देत बाहेर पडलो, अशी स्पष्टोक्ती शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी मंगळवारी केली.

काँग्रेस सोडल्यानंतर चार महिन्यांनी मिलिंद देवरा यांनी हे भाष्य केले. काँग्रेस माझ्यासाठी आता भूतकाळ आहे. मला आता भविष्याकडे बघायचे आहे. मात्र तरीही दक्षिण मुंबई देशातील सर्वांत उत्तम लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे जेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो, तेव्हा हा मतदारसंघ सोडू नये असे मी स्पष्ट शब्दांत काँग्रेस नेतृत्वाला सांगितले होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात दबाव टाकला. साहजिकच मला बाहेर पडावे लागले, असे देवरा म्हणाले. याआधी, हर्षवर्धन पाटील यांनीही काँग्रेस सोडताना मित्रपक्षावर शरसंधान साधले होते. राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्यावर ताशेरे ओढत पाटलांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यावरुन डिवचताना सुप्रिया सुळेंनी ‘दिराशी भांडण, मग नवऱ्याला का सोडता?’ अशी टीकाही केली होती. दरम्यान, दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती त्यावरही देवरा यांनी भाष्य केले. माझी कुठेही घालमेल नव्हती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला संधी दिलेली आहे. मला राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवल्याबद्दल मी फार आनंदी आहे. यामिनी जाधव या लढवय्या आहेत. त्या नक्कीच निवडून येतील याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. मतदान धीम्या गतीने झाले असे म्हणण्यात अर्थ नाही. आपली हार लपवण्यासाठी ते या पद्धतीचे वक्तव्य करत आहेत, असेही ते म्हणाले.

मोदींसाठी मत दिले

गेली 45 वर्षे कायम देवरा कुटुंबीयांचेच नाव मतपत्रिकेवर होते आणि मला अभिमान आहे की मी माझ्या आधीच्या कुटुंबासाठी नव्हे तर मी शिवसेनेला, धनुष्यबाणाला मत दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी मी मत दिले. महायुतीकडे पाच पांडव होते आणि या पाच पांडवांनी या ठिकाणी काम केलेले आहे असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.