लोकशाही न्यूज नेटवर्क
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. प्रसिद्ध ई-कॉमर्स फर्म मीशोने आगामी सणासुदीच्या काळात वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ते विक्रेता आणि लॉजिस्टिक नेटवर्कमध्ये जवळपास 5 लाख हंगामी नोकऱ्या देणार असल्याची घोषणा केली आहे.
आगामी सणासुदीच्या काळात ईकॉम एक्सप्रेस, डीटीडीसी, इलास्टिक रन, लोडशेअर, दिल्लीव्हरी, शॅडोफॅक्स आणि एक्सप्रेसबीज यांसारख्या थर्ड पार्टी लॉजिस्टिक भागीदारीद्वारे सुमारे 2 लाख रोजगार संधी निर्माण करण्याचे मीशोचे उद्दिष्ट आहे. यातील 60 टक्क्यांहून अधिक संधी या टियर-III आणि टियर-IV भागात असणार आहेत. या नोकऱ्यांमध्ये प्रामुख्याने उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत ऑर्डर पोहचवणारे, डिलिव्हरी पिकिंग, सॉर्टिंग, लोडिंग, अनलोडिंग आणि रिटर्न इन्स्पेक्शन यासारख्या कामांसाठी लागणाऱ्या सहकाऱ्यांचा समावेश असेल.
‘मीशो’मधील वरिष्ठ अधिकारी सौरभ पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला या सणासुदीच्या काळात मागणीत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे, या नोकरीच्या संधी निर्णाण करण्याची प्रक्रिया ही या सणासुदीच्या काळात ग्राहकांचा एकंदरीत अनुभव वाढवण्यावर आणि असंख्य लहान व्यवसायांना सक्षम बनविण्यावर केंद्रित आहे. तसेच मीशो विक्रेते सणासुदीच्या हंगामासाठी 3 लाख हंगामी कामगारांना कामावर ठेवण्याचा अंदाज आहे. हे हंगामी कामगार ग्राहकांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मीशोच्या विक्रेत्यांना उत्पादन, पॅकेजिंग आणि वर्गीकरण यासह विविध कामांमध्ये मदत करतील. मीशोचे 80 टक्क्यांहून अधिक विक्रेते फॅशन अॅक्सेसरीज आणि उत्सवाची सजावट यासारख्या नवीन कॅटेगरीमध्ये देखील नवीन उत्पादने घेऊन येण्याच्या विचारात आहेत. वाढत्या मागणीसाठी तयारीचा भाग म्हणून मीशोचे 30 टक्क्यांहून अधिक विक्रेते हे सध्या स्टोरेज स्पेस भाड्याने घेण्यासाठी गुंतवणूक देखील करत आहेत.