नवी दिल्ली ;- निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी महाराष्ट्राच्या विदर्भातील ५ जागांसह देशभरातील २१ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ जागांसाठी मतदान घेण्यात येत आहे. यात दाक्षिणात्य राज्य तामिळनाडूतील सर्व ३९ जागा व राज्यातील नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, रामटेक व चंद्रपूर या पाच जागांचा समावेश आहे. तसेच ईशान्य भारतातील सिक्कीम व अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीसुद्धा एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. मतदानासाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाली आहे.
देशभरातील १.८७ लाख केंद्रांवर पहिल्या टप्प्याचे मतदान सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होईल. एकूण ९७ कोटींपैकी १६.६३कोटी मतदार शुक्रवारी हक्क बजावणार आहेत. यात ८.४ कोटी पुरुष तर ८.२३ कोटी महिला आणि ११,३७१ तृतीयपंथीय मतदार आहेत. यंदा ३५.६७ लाख नवमतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. या टप्प्यात ३.५१ कोटी मतदार वर्ग हा २० ते २९ वयोगटातील आहे. दरम्यान, या मतदानासाठी १८ लाख पोलीस व जवान पहारा देणार आहेत.
पहिल्या टप्प्यात तामिळनाडू (३९) आणि उत्तराखंड (५) या दोन राज्यांतील मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. याशिवाय अरुणाचल प्रदेश (२), मेघालय (२), मिझोरम (१), नागालँड (१), सिक्कीम (१) ही ईशान्येकडील राज्ये आणि अंदमान-निकोबार, लक्षद्वीप व पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. याव्यतिरिक्त आसाम (५), बिहार (४), छत्तीसगड (१), मध्य प्रदेश (६), महाराष्ट्र (५), मणिपूर (२), राजस्थान (१२),
त्रिपुरा (१), उत्तर प्रदेश (८), पश्चिम बंगाल (३), जम्मू- काश्मीर (१) या जागांवर मतदान घेण्यात येणार आहे.