मतदान यंत्रांचे 8 एप्रिल रोजी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समक्ष होणार सरमिसळ

0

जळगाव ;– लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान यंत्रांचे (EVM आणि VVPAT) चे 8 एप्रिल रोजी संगणकृत सरमिसळ (Randomization) करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर तयार असलेले विधानसभा मतदार क्षेत्र निहाय मतदान यंत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी जारी केले आहेत. तसेच यावेळी सर्वं राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावले असून त्या सर्वांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहनही जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय मतदान यंत्रांचे संगणीकृत सरमिसळ दि.8 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. संगणकृत सरमिसळ झाल्यानंतर तयार करण्यात आलेली विधानसभा मतदारसंघ मतदान यंत्रांची माहिती जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळविण्यात येणार आहे. सदरील यादीनुसार विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय मतदान यंत्रे शासकीय गोदाम, तहसील कार्यालय आवार भुसावळ येथून दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजेपासून त्या त्या विधानसभा मतदार क्षेत्रातील प्राधिकृत अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.सदर मतदान यंत्राच्या यादीप्रमाणे मतदान यंत्रे ताब्यात घेण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नायब तहसीलदार यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करणे आवश्यक आहे. प्राधिकृत अधिकारी यांच्यासह स्कॅनिंग साठी नियुक्त केलेले कर्मचारी असे एकूण दहा कर्मचारी मतदान यंत्रे ताब्यात घेण्यासाठी पाठविण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या आदेशात आहेत. या सोबतच आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे देखील आदेशित करण्यात आले आहे. त्यासोबतच सदरील मतदान यंत्रांचे विधानसभा मतदारसंघातील सुरक्षा कक्षा पर्यंत वाहतूक करणे व त्याची सुरक्षा तसेच साठवणूक करणे याबाबत भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे देखील सुचित करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.