चिंता वाढली! मान्सून सक्रिय होण्यास लागणार वेळ

अनेक ठिकाणी उष्णता वाढली : बळीराजासमोर संकट

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसापेक्षा उन्हाळी वातावरणाचीच जाणीव झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईसह राज्यात प्रचंड उकाडा जाणवू लागला आहे. जळगाव जिल्ह्यातही अशीच स्थिती असल्यामुळे शेतीच्या कामांची सुरुवात करण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी वर्गाची चिंता आता वाढली आहे.

यंदाच्या वर्षी नैऋत्य मोसमी वारे, अर्थात मान्सूनने देशात निर्धारित वेळेआधीच हजेरी लावली. ज्यानंतर पहिल्या आठवड्यात तो मनसोक्त कोसळला. पण, त्यानंतर मात्र मान्सूनचा वेग मंदावताना दिसता. सध्या दक्षिण भारतामध्ये पावसाची संततधार तर, काही भागांमध्ये मुसळधार सुरु असलीही तरीही, महाराष्ट्रात मात्र त्याचा जोर ओसरल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक भागांमध्ये तर ढगाळ वातावरण नसल्याने प्रखर सूर्यप्रकाश आणि उष्णतेचा दाह अधिक अडचणी वाढवताना दिसत आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या कोकण किनारपट्टीपासून थेट विदर्भापर्यंत सक्रिय असणाऱ्या मान्सूनचा जोर काही अंशी कमी झाला असून, त्यामुळे तापमानाच किमान तीन ते चार अंशांनी वाढ होऊन हा आकडा काही भागांमध्ये 35 ते 40 अंशांच्या घरात पोहोचला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सून वारे पोहोचले नसले तरीही तापमानवाढीमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेतून ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. हवामानाच्या याच स्थितीच्या धर्तीवर सध्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामानाच्या अंदाजानुसार पुढील तीन-चार दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पर्जन्यमानाचा अंदाज आहे. या काळात अरबी समुद्रातील र्नैऋत्य मोसमी पावसाची शाखा आणखी सक्रिय होणार असून, बंगालच्या उपसागरातील शाखा या आठवड्यात सक्रिय होऊन पुढच्या दिशेने वाटचाल सुरु करेल असा अंदाज आहे. ज्यामुळे आता पावसाशी गाठभेट थेट 20 – 21 जूनला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिथून पुढे मान्सून संपूर्ण देशभरात सक्रिय होण्याची चिन्हेही दिसू लागतील.

 

उत्तर भारतात उष्णतेची लाट 

महाराष्ट्रात मान्सूनची प्रतिक्षा असतानाच दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मात्र उष्णतेच्या लाटेने हाहाकार माजवला आहे. दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी तापमान 44 ते 45 अंशांच्या घरात असून प्रयागराजमध्ये हा आकडा 47 अंशांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. वाढता उकाडा पाहता हवामान विभागाने नागरिक आणि यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला नागरिकांना दिला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.