महावितरणच्या जनमित्रांचा गौरव लाईनमन दिवस उत्साहात साजरा

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जनमित्रांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महावितरणतर्फे लाईनमन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जनमित्रांचा गौरव करण्याबरोबरच विद्युत सुरक्षेची शपथ घेण्यात आली.

यावेळी सर्व जनमित्रांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता कैलास हुमणे होते. तर अधीक्षक अभियंता राजेंद्र मार्के, कार्यकारी अभियंता व्ही.बी. पाटील, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता धीरज बारापत्रे, व्यवस्थापक तन्वी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मुख्य अभियंता कैलास हुमणे म्हणाले की, जनमित्र हा महावितरणचा चेहरा आहे. महावितरणच्या व्यवस्थेमधील तो अत्यंत महत्वाचा घटक आहे. ऊन, वारा, पाऊस व इतर कठीण परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी जनमित्र अहोरात्र परिश्रम करतात. सुरळीत वीजपुरवठ्याबरोबरच कंपनीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी वीजबिल वसुलीच्या कामातही जनमित्रांनी पुढाकार घ्यावा आणि कंपनीला प्रगतिपथावर न्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विद्युत सुरक्षेबाबत जनमित्रांचे प्रबोधन करण्यात आले तसेच विद्युत सुरक्षेची शपथ घेण्यात आली. सुरक्षा साहित्याच्या वापरासह काम करताना खबरदारी घेण्याचे आवाहन जनमित्रांना करण्यात आले. काही जनमित्रांनी प्रातिनिधीक मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास किरण महाजन, नाझरकर, घुगे, हिरालाल सोनवणे, नितिन रामकुवर, कमलेश भोळे, पराग बडगुजर, किशोर मराठे, उमाकांत विसपुते, सलीम तडवी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रत्ना पाटील व राहुल निकम यांनी केले तर आभारप्रदर्शन उपव्यवस्थापक चेतन तायडे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.