भक्तीरसाने ओतप्रोत असलेली संत एकनाथांची अभंगवाणी

0

लोकशाही विशेष लेख

भागवत सांप्रदायातील एक अद्वितीय संतकवी म्हणून संत एकनाथ महाराजांची ओळख आहे. त्यांचा जन्म इ.स. १५३२ मध्ये पैठण येथे झाला. त्यांची वंशपरंपरा भानुदास-चक्रपाणि-सूर्यनारायण-एकनाथ अशी आहे. सुप्रसिध्द संत भानुदास महाराज यांचे संत एकनाथ हे पणतू होते. त्यांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला होता. आईवडिल लहानपणीच वारल्याने त्यांचा सांभाळ आजा चक्रपाणि यांनी केला. पैठणला त्यावेळी विद्येचे माहेरघर किंबहुना संस्कृतच्या विद्येचे माहेरघर म्हणत असत. त्याचे संस्कार नाथांवर झाले. संत एकनाथ बालपणापासूनच बुध्दीमान आणि श्रध्दावान होते. भक्तीविषयी अगाध संस्कार-संत एकनाथांनी संपूर्ण आयुष्यभर अभंग लेखनातून व आपल्या वागणुकीतून समाजप्रबोधनाचे कार्य अखंडपणे केले. त्यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे ते शांतीचा पुतळा होते. परमेश्‍वराची भक्ती त्यांच्या घराण्यात पूर्वीपासूनच होती. त्यामुळे भक्तीविषयीचे अगाध संस्कार नाथांवर झाले. त्यांनी आजोबांची आज्ञा न घेताच देवगडावर असणार्‍या जनार्दन स्वामींची सेवा केली. जनार्दन स्वामींनी त्यांना प्रपंच व परमार्थ साधण्याचा किंबहुना आचरण्याचा उपदेश केला. त्यामुळेच नाथांनी लिहीलेल्या प्रत्येक अभंगाच्या शेवटी एका जनार्दनी असे वाक्य वापरलेले आपणास दिसून येईल.

सहा वर्षांच्या कालावधीत जनार्दन स्वामींकडे गुरूभक्ती केल्यानंतर नाथांना भगवंताच्या सगुण भक्तीचा साक्षात्कार झाला. त्यानंतर दोघा गुरूशिष्यांनी तिर्थयात्रा केली. त्याआधी त्यांनी पंचवटी येथे जनार्दन स्वामी यांच्या आज्ञेने चतु:श्‍लोकी भागवतावर ओबीबध्द टिका केली. तिर्थयात्रेहून परतल्यानंतर २५व्या वर्षी ते गुरूंच्या आज्ञेने पैठणला आले व त्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यानंतरचे उरलेले आयुष्य त्यांनी पैठणलाच घालवून परमार्थ सेवेसाठी स्वत:ला वाहून घेतले. देहाने व मनाने समाधानकारक अध्यात्मिक जीवन जगून त्यांनी शके १५२१ मध्ये फाल्गुन वद्य षष्ठीस आपला देह पैठण येथे ठेवला.
ग्रंथांमधील भक्ती, संत एकनाथांची ग्रंथसंपदा भक्तीने समृद्ध अशी आहे. त्यांच्या चतु:श्‍लोकी भागवत, एकादश स्कंधावरील टिका, भावार्थ रामायण, रूक्मिणी स्वयंवर, हस्तामलक, स्वात्मसुख, शुकाष्टक, आनंदलहरी, चिरंजीवपद, पौराणिक आख्याने, संतचरित्रे, अभंगरचना, पदे, भारूडे या रचनांमधून त्यांनी भागवतधर्म व भागवतभक्तीचा प्रसार करणे हेच ध्येय ठेवले. त्यामुळे त्यांच्या विविध रचनांमध्ये भक्तीचा सखोल, सविस्तर, सप्रमाण, विवेचनात्मक विचार आलेला आहे. एकनाथी भागवत या ग्रंथात तर त्यांनी भक्तीचे सविस्तर विश्‍लेषणच केले आहे. नाथ भागवत म्हणजे मूळ भागवताप्रमाणे भक्तीप्रधानच आहे.

भक्ती, विरक्ती, प्रेमानुभव व गुरूमहिमा हा नाथभागवताचा चार पायांचा आत्माच आहे. तसेच त्याचा रसाळ व प्रसादपूर्ण आविष्कार देखील आहे. नामभक्ती महात्म्य संत एकनाथांनी भगवंताच्या नामाचे दर्शन विविध अंगांनी घडविलेले आहे. त्यांनी आपल्या रचनांमधून नामाचे व नामभक्ती साधनेचे स्वरूप स्वत:च्या अनुभवाने सांगितलेले आहे. संत एकनाथांनी आयुष्यभर गुरूआज्ञेला प्रमाण मानून नामभक्तीचाच उपदेश केला. त्यांचा हरीपाठ तर संपूर्णपणे हरी या नामावरच आधारलेला आहे. हरी या शब्दापासून सुरू झालेला २५ अभंगांचा हरीपाठ हरी या नामानेच ठासून भरलेला आहे. नामाचे महत्व, नाम न घेणारा कोण असतो? नामभक्तीचा परिणाम यासह विविध नाममहात्म्य त्यात वर्णन केलेले आहे.

चहूं मुक्तीहूनी वरती । उल्हास नांदे माझी भक्ती ।।
माझे भक्तीची अनिवार शक्ती । तिसी मी निश्‍चिती आकळलो ।।

ज्ञान, वैराग्य, निवृत्ती, धृती, शांती व ब्रह्मस्थिती यांची जननी भगवंताची भक्ती आहे. चारही मुक्तींपेक्षा ती श्रेष्ठ आहे. तिची शक्ती खूप मोठी आहे. भक्तीनेच परमात्मा बांधला गेला असून त्याचे स्वरूप अनंत व अपार असूनही भगवंत हा भक्तीमध्येच गुरूफटलेला आहे, असे श्रीकृष्ण उध्दवास म्हणत असल्याचे नाथांनी भागवतात म्हटले आहे. भगवंत नेहमी भक्तांच्या दारात उभा असतो. तो भक्तीनेच बंदीस्त होऊन नेहमी भक्तांच्या अधीन असतो. भगवंतालाही भक्तीचा महिमा कळत नाही. काही लोक भक्ती करून मोक्ष, मुक्ती मागतात. परंतु जो मुक्तीची अपेक्षा न करता उपेक्षा करून भगवंताची भक्ती करतो तोच धन्य होय. कारण जेथे भगवंताची भक्ती असेल त्याठिकाणी चारही मुक्ती पायाशी लोटांगण घालीत असतात. नाथांनी भागवतात नामभक्तीचे महात्म्य वर्णन केलेले आहे. नाम प्रक्रियेचे स्वरूप, नामाचे आविष्कार, फायदे, अडथळे, नामसाधना, योगसाधना, नामसाधनेतील पथ्ये, नाम व ध्यान, नाम व समाधी, नामाचे सगुण व निर्गुण रूप, नामाची प्राप्ती आणि नामाची फलश्रृती आदी अंगांनी नामाचे दर्शन भागवतात नाथांनी घडविलेले आहे. नामभक्तीलाच ते मोक्षावरील गुरूभक्ती म्हणतात, अशी त्यांच्या अभंगांतून नाममयता प्रकट झालेली आहे. संत एकनाथांचा भागवत ग्रंथ भगवद्भक्तीने ठासून भरल्यामुळे त्यांनी भगवंत व त्यांची भक्ती यांचेच निरूपण प्रामुख्याने केलेले आहे.

नवविधाभक्ती महात्म्य – संत एकनाथांनी त्यांच्या अभंगगाथेत भक्त प्रल्हादाने सांगितलेल्या नवविधाभक्तीपर अभंगरचनेतून भक्ती व भक्त यांचे दर्शन घडविलेले आहे.
नवविधाभक्ती नवआचरती । त्याची नामकिर्ती सांगू आता ।।
नवविधाभक्ती नवजणे केली । पूर्ण प्राप्ती जाली तयालागी ।।

भागवतप्रणित भक्त प्रल्हादाने सांगितलेली नवविधाभक्ती, भक्तीचे प्रकार, भगवंत, त्या भक्तीची वैशिष्ट्यपूर्णता, भगवंताशी अतूट संबंध आदी बाबींचा संत एकनाथ महाराज यांनी आपल्या रचनेत समावेश केला आहे. एकनाथांच्या अभंगगाथेत नवविधाभक्तीचे दर्शन घडते. श्रवण, कीर्तन, भक्तीचे महानत्व त्यांच्या अभंगात आढळते. त्यांनी सांगितलेल्या भक्तीची साधने भगवंताचे नामस्मरण व नामसंकीर्तन होय. संत एकनाथांनी फक्त नवविधाभक्तीचा पुरस्कारच केलेला नाही तर ती भक्ती स्वत: अनुभवलेली आहे. त्यांची पादसेवन भक्ती,

पायाचे चिंतन । माझे हेचि भजन ।। चरणाची सेवा आवडी करीन । कायावाचामन धरूनी जीवी ।।
अशी होती. एवढेच नव्हे तर नाथांची दास्यभक्ती,
दास्यत्वे चोखट । रामनामे सोपी वाट ।।
अशी समर्पित होती. अशा प्रकारे त्यांच्या अभंगातून तसेच इतर रचनांमधून त्यांनी केलेल्या नवविधाभक्तीचे दर्शन घडून येते.

डॉ.जगदीश पाटील,भुसावळ
8149498020

 

Leave A Reply

Your email address will not be published.