संसार ‘विवेका’ने नीटनेटका करावा – पु. पदमचंद्रजी म.सा

0

प्रवचन सारांश  –  दि.  7 ऑगस्ट 2022

संसार  ‘असार’ आहे असे म्हटले जाते. खरे पाहिले तर संसारातच सार आहे हे ध्यानात ठेवले पाहिजे. संसार जर विवेकाने, नीटनेटका केला तर घरात हिंसा मुळीच होणार नाही. संसारात अविवेक आला तर हिंसा येते. घरगुती हिंसेपासून वाचायचे असेल तर विवेकाने संसार करा असे आवाहन अनुप्पेहा ध्यानप्रणेता डॉ. पदमचंद्रमुनी यांनी आजच्या विशेष प्रवचनातून केले. अत्यंत प्रभावी अशा प्रवचनाचा लाभ शेकडो श्रावक-श्राविकांनी घेतला. जळगाव येथील स्वाध्याय भवन येथे जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर पू. पार्श्वचंद्रजी म.सा. आदीठाणा 7 यांच्या पवित्र सानिध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे.

संसार करत असताना प्रत्येकाने ‘भाषा विवेक’ ठेवला पाहिजे. पूर्वी पती-पत्नी एकमेकांप्रती आदरभाव ठेवत असत. जिथे ‘संवाद’ संपतो तिथे विवाद सुरू होतो, भांडणे सुरू होतात. आपली जैन संस्कृती ‘जिओ और जिने दो’ यावर विश्वास ठेवणारी आहे. क्रोधामुळे एका क्षणात उद्ध्वस्त परिवार झालेत  त्याचे उदाहरण अनेकदा बघायला मिळतात. त्याबाबत मद्रास येथे घडलेली सत्य घटना त्यांनी सांगितली. पूर्वी देखील घरात भांडणे होत असत. त्याचा न्याय निवाडा पंचमंडळी यांच्या उपस्थितीत होत असे, पण आता संस्कृतीचे बदलत आहे. ‘घरेलू हिंसा’ व्यक्ति घर नव्हे तर पूर्ण समाजाला बरबाद करू शकते. तुमच्याकडे कितीही पैसा असो तुमची भाषा जर गरीब असेल तर त्याचा काय उपयोग ? आई-वडिलांचा घटस्फोट होतो पण त्याचा दुष्परिणाम मुलांना सहन करावा लागतो. वागतांना, बोलताना, खाता पितांना सर्वच ठिकाणी ‘विवेकाचा’ अवलंब करणे आवश्यक आहे असं आवाहन आजच्या प्रवचनातून करण्यात आले.

घरेलू हिंसा टाळण्याचे उपाय देखील प्रवचनातून सांगितले  गेले. परिवाराला वेळ द्या, आपसात चांगला संवाद ठेवा, प्रेम भाव ठेवा व  तो वाढावा, पती-पत्नीमध्ये बेबनाव झालाच तर आपल्या गुरूंकडे जाऊन स्पष्टपणे बोला. अडचणी सांगा. त्यावर गुरु नक्की उपाय सांगतील. विवेकाने, प्रेमाने वागले तर घरेलू हिंसा होणार नाही असेही डॉ. पदमचंद्र म. सा. यांनी प्रवचनातून मार्गदर्शन करताना सांगितले.

‘मेरी भावना’ या प्रवचन मालेत पूज्य पदमचंद्रमुनी यांचे सुशिष्य जयपुरंदरमुनी यांनी देखील प्रवचन केले. असे म्हटलेय की जिनवाणी म्हणजे पारस होय. इतके वर्ष झाले लोक जिनवाणी ऐकत आहेत परंतु आत्म्याचे परमात्म्यात रूपांतर का झाले नाही? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. जिनवाणीचा प्रभाव कमी झाला की ऐकणाऱ्यांचा प्रभाव कमी झाला हा महत्त्वाचा मुद्दा आहे. खरे तर गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय, सत्संगाशिवाय आत्म्याचे परमात्म्यामध्ये परिवर्तन होणे केवळ अशक्य. महापुरुषांच्या संगतीत आत्मा राहत असेल तर आत्म्याचा जरूर उत्कर्ष होतो. आपण कुसंगती पासून स्वतःला वाचवले पाहिजे. त्यासाठी सत्संगती किंवा सत्संग अनुसरला पाहिजे. याबाबतची नारदाची एक आख्यायिका त्यांनी आपल्या प्रवचनातून सांगितली.

—– ¤¤——

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.