जळगावसह राज्यात टोमॅटोला आली लाली ! ; मिरचीही झाली तिखट !

0

जळगाव ;-

गृहिणींना स्वयंपाक घरात आवश्यक असणाऱ्या भाजीपाल्यांमध्ये टोमॅटो आणि मिरची या दोघाचे भाव चांगलेच वधारल्यामुळे अनेकांचा जीव मेटाकुटीस आला आहे. एक दीड महिन्यांपूर्वी अगदी पाच ते दहा रुपये किलो दराने मिळणार टोमाटो बाजारात १०० रुपये प्रमाणे विकला जात आहे . तोच मिरचीचा ठसका कायम आहे मिरचीनेही १०० रुपये किलोचा दर गाठला आहे.

अवघ्या महिन्याभरापूर्वी टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत होता. बाजारात माल न्यायचा खर्च सुध्दा परवडत नसल्यामुळे टोमॅटो फेकून द्यायची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली होती. परंतु सध्या मात्र टोमॅटोचा बाजार तेजीत आला असून राज्यातील प्रमुख शहरांमध्ये किरकोळ बाजारात टोमॅटो प्रति किलो शंभर रुपये भावाने विकला जात आहे.

राज्यात नाशिक, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. पुणे जिल्ह्यातील मंचर, नारायणगाव, खेड हा भाग टोमॅटोसाठी प्रसिध्द आहे. टोमॅटोचं क्षेत्र घटल्यामुळे आवक मंदावल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या पुणे, नाशिक आणि नवी मुंबई (वाशी) बाजारसमित्यांमध्ये टोमॅटोची आवक कमी झाली आहे. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशातच टोमॅटोचे दर वाढलेले आहेत.

मिरचीचा तिखटपणा वाढला !
राज्यात हिरव्या मिरचीच्या दराचा ठसका वाढला आहे. . किरकोळ बाजारात मिरची प्रति किलो १०० ते १२० रूपयांपर्यंत पोहोचलीय. तर घाऊक बाजारात ६० ते ७० रूपये किलो दर मिळतोय. सध्या शेतकरी रान तयार करून खरीप पेरण्यांच्या तयारीत आहेत. त्यासाठी पावसाची वाट बघतायत.

त्यामुळे सध्या मिरचीचा पुरवठा घटला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मिरचीची आवक रोडावलीय. त्यामुळे दर वाढलेत. दक्षिण भारतातही प्रमुख शहरांत मिरचीचे दर वाढलेत. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधून आवक घटल्याने तिथे दराने उसळी घेतलीय. पुढील एक ते दोन महिने दर चढे राहण्याचा अंदाज आहे.

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.