जळगावातील कोगटा दुकानातून वन्यजीवांचे अवशेष जप्त; तिघांना अटक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव (Jalgaon) शहरातील भवानी पेठेमध्ये (Bhawanipeth) वन विभागाने (Forest Department) मोठी कारवाई केली आहे. सोमवारी रात्री शहरातील भवानीपेठेतील रामनाद मुलचंद कोगटा (Ramnad Mulchand Kogata)  या दुकानात (Kogata Ayurvedic shop) वन विभागाने छापा टाकला. या छाप्यात वन विभागाने आठ प्रकारच्या वन्य प्राण्यांची शिकार करुन विक्रीसाठी (Sale of wildlife remains) ठेवलेले 347 प्रकारचे अवशेष जप्त करण्यात आले आहेत.

याप्रकरणी एका डॉक्टरसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या दुकानात आयुर्वेदिक वस्तू (Ayurvedic herbal shop) विकण्यात येत होत्या. त्या आड वन्य प्राण्यांची तस्करी करण्यात येत होती.

यांना केली अटक 

डॉ. अजय लक्ष्मीनारायण काेगटा (वय 53, रा. जळगाव), चुनीलाल नंदलाल पवार (वय 30, रा. खेडगाव तांडा, ता. एरंडोल) व लक्ष्मीकांत रामपाल मन्यार (वय 54, रा. जळगाव) असे वन विभागाने अटक केलेल्या संशयित तिघांची नावे आहेत.

असा टाकला छापा 

वन्य प्राण्यांची शिकार करुन त्यांची तस्करी करण्यात येत असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. इतरही एका ठिकाणी वन्य प्राण्यांची तस्करी होत असल्याची माहिती होती. वन्य प्राण्यांच्या अवशेषांची कोगटांच्या दुकानात विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या पथकाने त्या दुकानावर छापा टाकला.

वन्यप्राण्यांचे अवशेष जप्त 

या छाप्यात हताजोडी 11 नग, राजमांजर रंगनी 11, सियारसिंगी 260, कासवपाठ एक, इंद्रजाल 38, नाग मणके 21, घुबडींची नखे 3, समुद्रघोडा 2 या वन्यप्राण्यांचे अवशेष वन विभागाच्या पथकाने दुकानातून जप्त केले आहेत. या प्रजातींचा समावेश वन्यजीव कायदा 1972 मधील परिशिष्ठ 1 व 2 मध्ये समावेश आहे. या प्राण्यांच्या शिकारीसाठी 7 वर्ष कारावासाची तरतूद आहे.

यांनी केली कारवाई 

सहायक वनसंरक्षक सुदर्शन शिसव, वनपरिक्षेत्र अधिकारी, अमोल पंडित, दत्तात्रय लोंढे, वनपाल संदिप पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली. तपास उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

तिघांना तीन दिवसांची वनकोठडी 

अटक करण्यात आलेल्या तिघांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे. तिघांनी वन्य प्राण्यांची शिकार कोठे केली. त्यांची तस्करी कोठे करीत होते. आतापर्यंत किती वन्य प्राण्यांची शिकार करुन तस्करी केली, याबाबत वनविभाग संशयितांची चौकशी करीत आहे. सोमवारी रात्री झालेल्या कारवाईची वन विभागाकडून मंगळवारी सायंकाळी माहिती देण्यात आली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.