ठाकरेंच्या माफिया सरकारची उलटी गिनती सुरु- सोमय्यांच्या इशारा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच रंगले आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव करत भाजपा उमेदवार धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. महाडिक यांच्या अनपेक्षित विजयानंतर भाजपा गटात जल्लोषाचे वातावरण आहे. या विजयानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

उलटी गिनती सुरु

‘ठाकरे यांचे माफिया सरकारचे काउन्ट डाउन, उलटी गिनती सुरु’ असे ट्विट सोमय्यांनी केले आहे. राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागण्याअगोदर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमचे चारही उमेदवार विजयी होतील असा दावा केला होता. मात्र, निकालानंतर त्यांचा हा दावा फोल ठरला. सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार यांना प्रबळ उमेदवार मानले जात होते. महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असतानाही भाजपाने सहाव्या जागेवर आपला उमेदवार धनंजय महाडिक यांना राज्यसभेवर निवडून आणले. धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर भाजपाने शिवसेनेला डिवचायला सुरुवात केली आहे. आमच्या तिसऱ्या उमेदवाराला संजय राऊतांपेक्षाही जास्त मतं मिळाली असा खोचक टोला फडणवीसांनी शिवसेनेला लगावला आहे.

.. तर आम्ही जिंकलो असतो- राऊत 

तर संजय राऊत यांनी सहाव्या जागेवर पराभव झाल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाने जरी सहावी जागा जिंकली तरी त्यांचा विजय झाला असं मी मानत नाही. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत महाडिकांचा विजय झाला आहे. मात्र, भाजपाकडून हा मोठा विजय असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. पहिल्या पसंतीच्या मतांचा विचार झाला असता तर आम्ही जिंकलो असतो. असो, तरीही त्यांचे अभिनंदन असे राऊत म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.