जननी जनक माया लेकरू काय जाणे ?

0

करुणाष्टक – 9

जननिजकमाया लेंकरूं काय जाणे I
पय न लगत मूखीं हाणिता वत्स नेणे II
जळधरकरण आशा लागली चातकासी I
हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी II

मार्च – एप्रिल महिना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची पर्वणी. चांगले गुण मिळवण्याची अनिवार इच्छा असल्याने एकच ध्यास लागतो. दूरदर्शन, खेळ व इतर करमणूक बंद होते. खाण्यापिण्याकडे ही विशेष भान दिसत नाही. एकांतात रात्री काहीजण अभ्यास करतात.सर्व चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न असतो, तो म्हणजे अभ्यास. प्रत्येक विद्यार्थी आपल्या परीने यात व्यस्त असतो. ही नित्य परिचयाची पाहण्यातली घटना.

समर्थांनाही रामचंद्राची भेट हा एकच ध्यास लागला होता. तुझे रुपडे लोचनी म्या पहावे, ही आस होती. त्यासाठी ते व्याकुळ होते. त्यांना हा वियोग सहन होत नव्हता. ही रघु रायाच्या भेटीची अनावरता त्यांना अस्थिर करीत होती.रामरायाच्या चरणाशी ही भावावस्था व व्यथा ते कधी मोकळेपणाने, कधी स्वच्छपणे, कधी उदासपणे, कधी कोमलपणे व्यक्त करत होते. रामरायापाशी संवाद साधत होते. हितगुज कधी प्रेमाने पाझरत होते तर कधी भावाने ओलेचिंब होत होते.

त्यातील माझे मन अचपळ आहे. माझा जन्म भजन रहित गेला अंतरीचा निश्चय सारखा काढतो आहे माझे हृदय जन्म जन्म जळत आहे. जंबूकी वासना मला जन्म मरणाच्या फेऱ्यात गुंतवत आहे. माझा प्राण कंठाशी आला आहे. ही वस्तुस्थिती असली व समर्थांची व्यथा असती तर त्या व्यथेची पुढे फुले झालीत कारण सर्व समर्थांना ठाऊक आहे ते म्हणतात, आई वडिलांचे प्रेम माया लेकरू काय जाणार? नऊ महिने उदरात वाढवून,पुढेही त्याचे कौतुक, लालन पोषण कधी रागवून कधी गोड बोलून ते लेकराला मोठे करतात.

पहा ना वासरू जन्मताच गाईला प्रेमाने पान्हा फुटतो. तो तिला आवरता येत नाही व त्या वासराला हे आचळा पर्यंत पोहोचण्यास कष्ट होतात. तेव्हा तिला कोठे हात असतात?ती पायाने त्यांना आपल्याजवळ ओढते. पण त्या पाठीमागे किती वात्सल्य असते.ती आपल्या पिल्लांना लाथा झाडते असे कोण म्हणेल?

तसाच हा रघुपति दिन वत्सल आहे.भक्तवत्सल आहे.तो मला जवळ घेणारच. दासांच मनोरथ पूर्ण करणारच कैवल्याचा दान देणारच व भक्तांना भूषण ठरवून तो कधीही माझी उपेक्षा करणार नाही. एकीकडे विरहाची भाव्यव्याकुलता तर एकीकडे रामाची सेवा संपन्न होणारच असा दृढ भाव, या दोघांची अवस्था त्यांनी अनुभवली होती.म्हणून ते म्हणतात,जननी जनक माया लेकरू काय जाणे? आई वडील तर कधी आपल्या लेकरांची उपेक्षा करीत नाहीत. मग हा तर सर्वश्रेष्ठ, परम दयाल असा सर्व सृष्टीचा पिता, निर्माता माझी उपेक्षा थोडीच करेल?

साधना काळातील त्यांचे अनुभव अंतकरणाला गहिवर आणतात.त्यांची प्रार्थना ही उदात्त होती, “रुपं देही, धनं देही” इतकीच ती मर्यादित नव्हती. तर रामाला माझी करुणा यावी मी एक रघुपतीचा बालकवी आहे व हीनदीन अंतकरणाने प्रार्थना करतो आहे की, रामा मला उत्तम धारणा दे, तुझ्या कृपेने पावन होईल व तुझा दास म्हणून पृथ्वीच्या पाठीवर तुझ्या किर्ती चा प्रचार-प्रसार करेन असा उदात्त हेतू व ध्येय या रामभक्ता जवळ होते.

केवळ रामरायाचे सगुण रुपडे लोचनी पहावे इतकीच त्यांची झेप नव्हती तर “देव मस्तकी धरावाI अवघा हलकल्लोळ करावाII” हे स्वप्न सत्यात आणण्याचा प्रयत्न होता. पण त्यासाठी त्यांना श्रीरामाचा आधार हवा होता. म्हणून पुढे आपल्या मनस्थितीचा हळुवार पदर उलगडत ते म्हणतात,

” जळधरकरण आशा लागली चातकासी I”

मेघातून बरसणारा पाण्याचा थेंब तेवढाच चातक फक्त ग्रहण करतो. त्यासाठी तो आसुसलेला असतो, प्रतीक्षा करत असतो किंवा चकोर चांदण्याच्या वर्षावाला चंद्रमा ही असतो. तो ते चांदणे पिऊन तृप्त होतो.

तसाच हा आसुसलेला जीवही आता घोर तपश्चर्या नंतर तुझ्या भेटीने तृप्त होईल, शांत होईल.प्रभू रामचंद्राच्या तपोभूमीत रामपदी विश्वास ठेवून गोदावरी व नंदिनीच्या संगमावर बारा वर्ष “श्रीराम जय राम जय जय राम”या तेरा अक्षरी मंत्राचा तेरा कोटी जप केला. समर्थांकडे भाव होता ,भक्ती होती. त्या भक्तीची शक्ती होती. त्यामुळे ते ही बोलत ते भावभक्तिच्या बळावरच.त्याची प्रचिती होती.त्त्यात संदेह नव्हता आपल्या अंतरंगीच्या व्यथा रामराया पुढे त्यांनी मोकळ्या स्वच्छ मनाने मांडल्या. म्हणून त्यांची पुढे फुले झाली व त्याच्या परीमलाचा गंध लाभला. आपणही असेच प्रभू प्रेमाने पुलकित होण्याचा प्रयत्न करून प्रसन्न व्यक्तिमत्वाने समर्थांच्या मागोमाग जाऊया.

II जय जय रघुवीर समर्थ II

लेखिका- भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.