मजवर करूणेचा राघवा पूर लोटी II

0

करुणाष्टक – 6

जळत हृदय माझे जन्म कोट्यानीकोटी I
मजवरी करूणेचा राघवा पुर लोटीः II
तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू I
षड्रिपू माझें तोडिं याचा समंधू II

पारमार्थिक संवेग – आवेग हा प्रत्येकाचा कमी-जास्त असतो. काहींचा लहानपणा पासुन हा आवेग तीव्र असतो. स्वतः समर्थ त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. लहानपणी ते एकटे बसले होते त्यांच्या आईने विचारले, बाळ काय करतोस? ते त्वरित उत्तरले, “चिंता करणे विश्वाची” व पुढे विवाह प्रसंगी “सावधान” हा शब्द कानी पडताच ते सावध झाले व थेट टाकळीस येऊन तपश्चर्येस सुरुवात केली. रामरायाची कृपा संपादन केली. हे मनोगत त्यांचेच आहे. तुझ्या भेटीविना रामराया माझे हृदय जळत आहे. मी जन्मोजन्मी तुझी कृपा व्हावी म्हणून वाट पहात आहे. आता तु करुणेचा सागर होऊन मला तुझ्यात सामावून घे.

ही स्थिती सर्वसामान्य प्रापंचिक जनाची नाही. त्यांना ‘हे ह्रदय तळमळीने जळणे’ याची कल्पना येणार नाही. एखादी व्यक्ती थोडी ऐहिक दृष्ट्या पुढे गेली की मत्सराने मनात जळणे ही एवढीच कल्पना आपल्याला येऊ शकते. पण रामाच्या भेटीसाठी तळमळणे हे अपवादात्मक घडते.

रामकृष्ण परमहंसांना कालीमातेचे प्रत्यक्ष दर्शन होई. ते म्हणतात संसारासाठी रडाल पण देवाने थेट भेट द्यावी म्हणून कोणी रडणार नाही. त्यांच्या स्वतःच्या उषा रडून भिजत. कुणाला ही गोष्ट वेडेपणाची वाटणे स्वाभाविक आहे. पण त्या शिवाय आत्मदर्शन होत नाही. पवित्र असे ज्ञान मिळत नाही. म्हणून अपवादात्मक असे भक्त-ज्ञानी आढळतात. वासुदेव सर्व ठिकाणी आहे असा बोध असणारा महात्मा दुर्लभ असतो.

ही स्थिती ज्ञानी भक्तांची, श्रेष्ठ महात्म्यांची आहे. ऐहिकाची तमा त्यांना नसते. विनोबाजी श्रेष्ठ भक्त होते. त्यांनी आपली स्वतःची पदवीची प्रमाणपत्रे जाळुन टाकली होती. ते म्हणतात, ‘याचा काय उपयोग?’ इतका तीव्र विरक्तीचा आवेग तितकंच मोठं असीम व शाश्वत ध्येय जीवना पुढे असल्याशिवाय अशा घटना घडु शकत नाहीत.

मीराबाई, “मेरा तो गिरिधर गोपाल दुसरा ना कोई” असे म्हणत. ही सर्व व्यक्तिमत्वे म्हणजे प्रत्यक्ष त्यागाची परिसीमा आहेत. भक्तीच्या सोपान पायऱ्या चढता- चढता भगवंताला आळवत-आळवता एक दिवस असा येतो की त्यांची तळमळ संपते, निवते

“झाले साधनांचे फळ I
संसार झालं सफळ II”

जे काय मिळवायचंय ते मिळून जातं. समर्थांच्या या तळमळीतूनच त्यांना राम दर्शन झाले. अहोरात्र बारा वर्ष ते पाण्यात उभे राहून साधना करीत होते व त्या कारुण्यसिंधूला आळवीत होते.

पण नुसतेच नाम घेणे हे त्यांचे प्रयोजन नव्हते, तर पुढे ते म्हणतात, “षङ्रिपु माझें तोडिं याचा समंधू” मला हे रिपू जिंकू दे. पहिला रिपू- काम, या कामना मर्यादित असू देत. दुसरा रिपू- क्रोध, एका विशिष्ट वेळी तो माझ्यावर कुरघोडी करू नये. एखाद वेळेस आमटीत मीठ टाकायला विसरले तर लगेच रागवू नये. तिसरा रिपू-लोभ, चार माणसांच्या कुटुंबियांना चार रूमचा फ्लॅट पुरेसा वाटावा, अधिक लोभ नको. मोह हा असाच नकळत निर्माण होतो. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी तो टाळला. शिवाजी महाराजांनी सोन्या चांदीचा नजराणा त्यांना भेट दिला. तो त्यांनी क्षणात परत केला. मोह टाळता यावा लागतो. चौथा रिपू- मद, उगाचच मद असू नये. मी अमुक अमुक आहे हा ताठा, अभिमान अगदी सर्वांना असतो.

” नम्र झाला भुता I तेणे कोंडिले अनंता II “

अति नम्रताच व्यक्तीची योग्यता वाढवते. पाचवा रिपू-मत्सर, मत्सराचा जन्म नकळत होतो. जी गोष्ट आपल्याकडे नाही पण दुसऱ्याकडे असली की हा डोकं वर काढतो. शेवटचा सर्वात मोठा शत्रू, सहावा रिपू- अहंकार, अहंकार जन्मापासून असतो. सज्ञानालाही असतो व अज्ञानालाही असतो. एक-दीड वर्षांची दोन जुळी मुलं असली व त्यांच्या आईने एक केळ त्यांना अर्ध करून दिलं. नकळत एकाला थोडा लहान एकाला थोडा मोठा मिळाला तर ते घर डोक्यावर घेतात.

म्हणूनच समर्थ, या सहा रिपूंचा व माझा संबंध सोडून टाक असे म्हणतात. मगच त्या पवित्र ह्रदयात राम आसनस्थ होईल व संसाराचे सार्थक होईल.

II जय जय रघुवीर समर्थ II

लेखिका- भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.