‘जयप्रभा स्टुडिओ’साठी मराठी चित्रपटसृष्टीतील रंगकर्मींचा आंदोलन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओचे कुलूप जोपर्यंत खरेदी करणारे उघडून देत नाहीत, तोपर्यंत चित्रपटसृष्टीतील सर्व रंगकर्मी व सर्वसामान्य कोल्हापूरकर साखळी उपोषणाद्वारे लढा देऊ, असा निर्धार मराठी चित्रपटसृष्टीतील रंगकर्मींनी केला आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व चित्रपट व्यावसायिकांच्यावतीने रविवारपासून जयप्रभा स्टुडिओचे अस्तित्व अबाधित राहण्यासाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे.

यावेळी बोलताना विविध रंगकर्मींनी हा निर्धार व्यक्त केला. जयप्रभा स्टुडिओची दोन वर्षांपूर्वी विक्री झाल्याची बातमी ‘लोकमत’मधून शनिवारी प्रसिद्ध झाली. त्यानंतर रंगकर्मींसह कामगार आणि स्टुडिओशी भावनिकरित्या जोडला गेलेल्या अनेकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच जयप्रभा

स्टुडिओच्या दारात अक्षरश: नव्या-जुन्या कलाकारांसह जे जे घटक चित्रपटांशी संबंधित आहेत, त्या मंडळींनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावत उपोषणस्थळी सहभाग नोंदविला. अनेकांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. त्यामुळे पुन्हा एकदा स्टुडिओ आणि भालजी पेंढारकर यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. जोपर्यंत हा स्टुडिओ चित्रीकरणासाठी खुला होत नाही; तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा चंग सर्वांनी बांधला.

या आंदोलनात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, रणजित जाधव, माजी अध्यक्ष मिलिंद अष्टेकर, इम्तियाज बारगीर, रवींद्र गावडे, प्रसाद जमदग्नी, अरुण चोपदार, शैलेश चोपदार, नीलेश जाधव, राजनंदनी पतकी, माजी नगरसेविका व अभिनेत्री सुरेखा शहा, अभिनेता स्वप्निल राजशेखर, सतीश बिडकर, महामंडळाचे व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर आदी सहभागी झाले होते.

खरेदीदाराच्या जुन्या कार्यालयावर फेकली शाई

कोल्हापूरकरांना अंधारात ठेवून जयप्रभा स्टुडिओची खरेदी झाल्याने रविवारी उद्रेक झाला. ‘जयप्रभा’ची जागा खरेदी करणाऱ्यांचा निषेध असो’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी भवानी मंडपानजीक खरेदीदाराच्या जुन्या कार्यालयाबाहेर शाई फेकून निषेध नोंदवला.

यावेळी गोंधळ माजल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण झाले. पोलिसांनी आंदोलक सचिन तोडकर, रूपेश पाटील, दिलीप पाटील, नीलेश सुतार, भगवान कुरडे या पाच जणांना ताब्यात घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.