शेअर बाजार कोसळला ! सेन्सेक्स १३०० अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांना ४ लाख कोटींचा फटका

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क

आज आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारामध्ये व्यवहारांना सुरुवात झाल्यावर सेंसेक्स सुरुवातीलाच १५०० हून अधिक अंकांनी कोसळला. त्यानंतर सकाळी साडे अकरा वाजता तो ११७२ अंकांनी खाली ५६९८० वर ट्रेड होत होता. तर निफ्टीमध्येही मोठी पडझड झाली. निफ्टी ४०२ अंकांनी कोसळला होता. त्यानंतर तो ३५५ अंकांनी खाली १७ हजार १९ वर ट्रेड करत होता.

जागतिक घडामोडी, रेकॉर्डब्रेक महागाई आणि नुकत्याच उघडकीस आलेल्या २३ हजार कोटी रुपयांच्या एबीजी शिपयार्ड बँक घोटाळ्याचे पडसाद आज शेअर बाजारामध्ये स्पष्टपणे दिसून आले.

बँक, ऑटो, फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये २.५० टक्क्यांपासून ३ टक्क्यांपर्यंतची घसरण दिसून येत आहे. तर मेटल इंडेक्समध्ये ३.५० टक्क्यांनी घट झाली आहे. आज सेंसेक्सच्या टॉप ३० मध्ये केवळ टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये तेजीत आहे. बाकी २९ शेअरवर लाल निशाण दिसत आहे. एसबीआय, टाटा स्टील आणि एचडीएफसीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसत आहे.

भारतीय शेअर बाजारापूर्वी अन्य आशियाई बाजारामध्येही सकाळी मोठ्या प्रमाणामध्ये घसरण दिसून आली. जपानमधील बाजारात दोन टक्क्यांनी तर सिंगापूर आणि हाँगकाँगमध्येही १.५ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण दिसून येत होती. त्यापूर्वी शुक्रवारी अमेरिका आणि युरोपचे शेअर बाजारही घसरणीसह बंद झाले होते. त्याचा परिणाम स्टॉक मार्केटवर दिसून आला.

बाजारात विक्रीचा सपाला लागल्याने निफ्टीच्या इंडेक्समध्ये ३ टक्क्यांपेक्षा अधिक घट दिसून आली. आयसीआयसीआय बँक, पीएनबी आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर मोठ्या प्रमाणात व्यवसाय करत होते. बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने बीएसईमधील नोंदणीकृत कंपन्यांचे बाजारमूल्यसुद्धा सुमारे ५ लाख कोटी रुपयांनी कोसळले आहे. यात गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटींचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.