जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगावकरांसाठी (Jalgaonkar) मोठी बातमी आहे. जळगावकर पाणी वापरतांना जरा सांभाळून कारण येत्या आठवड्यात सलग दाेन दिवस शहरातील (Jalgaon City) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलशुद्धीकरण केंद्रामधून शहरात येणाऱ्या जुन्या जलवाहिनीला अमृत याेजनेंतर्गत कस्तूरी हाॅटेलजवळ जाेडणीचे काम केले जाणार आहे. हे काम २४ तासांपेक्षा जास्त वेळ सुरू राहणार आहे. त्यामुळे राेटेशन काेणत्या दिवशी बंद करावे याबाबत प्रशासन चाचपणी करीत आहे.
उमाळा येथे असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रापासून टाकण्यात आलेली सिमेंटची जलवाहिनी रामेश्वर काॅलनीतून मेहरूण स्मशानभूमीमार्गे शहरात दाखल हाेते. दरम्यान रामेश्वर काॅलनीत सतत जलवाहिनी गळती हाेत असल्याने त्या ठिकाणी १२०० मिलिमीटर व्यासाचे डीआय पाइप टाकण्यात आले आहेत. नवीन व जुनी जलवाहिनी जाेडणीचे काम महामार्गालगत केले जाणार आहे. यासाठी मक्तेदारामार्फत पाइप जाेडणीची ठिकाणे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात साेमवारनंतर काेणत्याही दिवशी जाेडणीचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यापूर्वी तीन दिवस आधीच महापालिकेकडून नागरिकांना कळवले जाणार आहे.
तसेच पुढच्या आठवड्यात सलग दाेन दिवस पाणीपुरवठा बंद (Jalgaon Water Supply) राहणार असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. दरम्यान अमृत पाणीपुरवठा याेजनेची चाचणी घेण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या माध्यमातून हे नियाेजन केले जाते आहे. म्हणून ऐनवेळी नागरिकांची गैरसाेय हाेऊ नये म्हणून आठवडाभर आधीच नागरिकांना सतर्क केले जाते आहे.