जळगावची लेक शिवांगी काळेला प्रधानमंत्री बाल शक्ती पुरस्कार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कठीण प्रसंगात आपले अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या बालकांना आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देशातील बाल शौर्य विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कोरोना सारखी आपत्ती असल्याने हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्कार जळगावची साडेसहा वर्षाची लेक शिवांगी काळे हिला प्रदान झाला आहे.

भारत सरकार प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार अंतर्गत बाल शक्ती पुरस्कार हा नवकल्पना, क्रीडा, कला आणि संस्कृती, समाजसेवा, शालेय क्षेत्र आणि शौर्य या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलांना दिला जातो. महिला आणि बाल विकास मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्याला एक लाख रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र दिले. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान २०२२ च्या चिल्ड्रन पुरस्कार विजेत्यांना ‘ब्लॉक चेन’ तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल प्रमाणपत्रे देण्यात आली.

आईचा जीव वाचवणारी शिवांगी

आपल्या आईला विजेचा धक्का लागला असतांना प्रसंगावधान राखून तिचे प्राण वाचविणार्‍या जळगाव येथील शिवांगी काळे या चिमुकलीला आज प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले.

५ जानेवारी २०२१ रोजी एक घटना घडली. शिवांगीची आई घरात बाथरूममध्ये असतांना त्यांना विजेच्या हिटरचा शॉक लागला. यामुळे त्यांच्या तोंडून किंचाळी बाहेर पडले. बाथरूमच्या बाहेर तेव्हा पाच वर्षाची असणारी शिवांगी ही दोन वर्षाच्या आपल्या बहिणीसह होती. या दोन्ही बहिणी आईची अवस्था पाहून घाबरल्या. मात्र शिवांगीने प्रसंगावधान राखून आईला स्पर्श न करता हिटरचे स्वीच बंद केले. यातून तिने आईचे प्राण तर वाचवलेच. पण ती आणि तिच्या बहिणीलादेखील दुर्घटनेपासून वाचविले.

यामुळे आज तिला प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह शिवांगी आणि तिच्या पालकांनी पंतप्रधानांशी संवाद साधला. या कार्यक्रमात तिला गौरविण्यात आले. जळगावच्या या लेकीने बहादूर आणि कौतूकास्पद कार्य करून पुरस्कर मिळवत जिल्ह्याचा नावलौकीक उंचावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.