धक्कादायक.. हेडफोन लावून रेल्वे क्रॉसिंग; तरूणीने गमावला जीव

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कानात हेडफोन लावून रेल्वे रूळ क्रॉसिंग करतांना अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कामावरून घरी जातांना कानात हेडफोन लावून रेल्वेरूळ क्रॉस करणाऱ्या तरूणीला धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शिवाजी नगर जवळ घडली. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

स्नेहल वैभव उज्जैनकर (वय १९, रा. धनाजी काळे नगर, जळगाव) असे मयत झालेल्या तरूणीचे नाव आहे. स्नेहल उज्जैनकर ही तरूणी आपल्या आईवडीलांसह शिवाजी नगर परिसरातील धनाजी काळे नगरात राहते. स्नेहल ही शहरातील एका कॉसमॅटीक दुकानावर नोकरीला आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी २३ मे रोजी रात्री ८.३० वाजता स्नेहल कामावरून घरी पायी जाण्यासाठी निघाली. स्नेहलने तिच्या कानात हेडफोन लावलेला होता.

जळगाव तहसील कार्यालयाजवळून शिवाजी नगरात जाण्यासाठी रेल्वेरूळ क्रॉस करत असतांना भुसावळकडून जळगावकडे येणारी धावत्या सुरत पॅसेंजर गाडीचा जोराचा धक्का लागल्याने स्नेहल जागीच ठार झाली. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीसांनी तातडीने धाव घेवून मृतदेह जिलहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला.

याप्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास लोहमार्ग पोलीस कर्मचारी सचिनकुमार भावसार आणि किशोर पाटील करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.