जिल्ह्यात उष्णतेची लाट.. उष्माघातापासून असा करा बचाव

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा तर काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर जळगाव जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुषंगाने पुढील पाच दिवस जिल्हयाच्या उष्णतामानात वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. यामुळे नागरिकांनी उष्मघातापासून बचाव करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या वाढत्या तापमानाने जिल्हयातील कामगार, मजुर, शेतमजुर तसेच शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व महिला या सर्व स्तरावरील नागरीकांचे उष्णतेच्या लाटेपासून बचाव करणेसाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हयातील सर्व तालुक्यातील संबंधित यंत्रणा आरोग्य विभाग, महानगरपालिका तसेच सर्व ग्रामपंचायत कार्यालयांनी उष्माघाताने होणारी जिवीतहानी टाळण्यासाठी आवश्यक त्या खबरदारी, दक्षता व उपाययोजना करण्यात याव्यात.

जिल्हयातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील लग्न समारंभ, धार्मिक व सामाजिक मेळावे तसेच शालेय व महाविद्यालय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा, समारंभ आयोजित करण्यात आलेले असल्याने अशा सर्व ठिकाणच्या आयोजक व प्रायोजकांनी उपस्थित सर्व नागरिकांचे उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आयोजनस्थळी सावलीसाठी ग्रीनशेड मंडप तसेच मुबलक प्रमाणात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा सुविधा करण्यात याव्यात.

त्याचप्रमाणे जिल्हयातील महानगरपालिका व ग्रामपंचायत क्षेत्रात रेल्वे, बसस्थानक, बाजार परिसर तसेच मंगल कार्यालय इ . ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे पाणपोई, सावलीसाठी ग्रीनशेड तसेच आरोग्य विभागाद्वारे सुसज्ज उष्माघात कक्ष स्थापन करावेत. जेणेकरुन उष्माघातांमुळे होणारी जिवीतहानी टाळता येणे शक्य होईल.

काय करावे

1. तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.
2. हलकी, पातळ व सच्छिद्र, सुती कपडे वापरावेत.
3. बाहेर जातांना गॉगल्स, छत्री / टोपी, बुट व चप्पलचा वापर करण्यात यावा.
4. प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
5. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा.
6. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू – पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करण्यात यावा.
7. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
8. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी घ्यावे.
9. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघडया ठेवण्यात याव्यात.
10. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.
11. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
12. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे.
13. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.
14. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा.
15. गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.
16. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत.
17. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावा.

काय करु नये

1. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये.
2. दुपारी 12.00 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
3. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
4. बाहेर तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. दुपारी 12.00 ते 03.30 या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे.
5. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडकी उघडी ठेवण्यात यावी.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.