विद्याधर गीत रंगात रसिक चिंब

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या सहकार्याने प्रख्यात संगीत नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने जळगावच्या स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व मुंबईच्या विद्याधर गोखले नाट्य संगीत प्रतिष्ठान या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने विद्याधर गीतरंग या कार्यक्रमाचे आयोजन कांताई सभागृहात करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार गुरुवंदनेने झाली.गुरुवंदना प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी सादर केली. कार्यक्रमाचे उद्घाटन व दीप प्रज्वलन जळगाव जिल्ह्याचे प्रांत महेश सुधळकर, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, डॉ. राजेंद्र फडके व उद्योजक किरण बेंडाळे यांच्याहस्ते झाले. मान्यवरांचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, राजेंद्र फडके, प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी केले. तर कलावंतांचे स्वागत प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष दीपिका चांदोरकर, प्रा. शरद चापेकर यांनी केले. या कार्यक्रमात ज्ञानेश पेंढारकर, नीलाक्षी पेंढारकर, प्राजक्ता जोशी व निमिश कैकाडी यांचा सहभाग होता. तर साथसंगत धनंजय पुराणिक (तबला) व वरद सोहनी (ऑर्गन) यांनी केली. कार्यक्रमाची संकल्पना व निवेदन . शुभदा दादरकर यांचे होते, आणि सुरू झाला नाट्यपदांचा एक अविरत झरा.

कार्यक्रमाची सुरुवात “सप्तसूर झंकारती बोले” या जय जय गौरीशंकर नाटकातील नांदी ने झाली. त्यानंतर ज्ञानेश पेंढारकरांनी जय जय गौरीशंकर नाटकातील “रमा रमण श्रीरंग” हे वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेले पद गायले त्यानंतर पंडित राज जगन्नाथ नाटकातील “मदनाची मंजिरी साजिरी” हे नाट्यपद सादर केले संगीतभूषण पं. राम मराठे यांनी संगीतबद्ध केलेले मंदार माला नाटकातील “कोण असशील तू न कळे” हे पद सादर केले. त्यानंतर नीलाक्षी पेंढारकर यांनी पं. राम मराठे यांनी संगीतबद्ध केलेले मंदार माला नाटकातील “सोहम हर डमरू बाजे” तसेच मदनाची मंजिरी नाटकातील प्रभाकर भालेकरांनी संगीतबद्ध केलेले “अंग अंग तव अनंग” व “ये मौसम है रंगीत” या नाट्यपदाने तर कहरच केला.

त्यानंतर शाब्बास बिरबल शाब्बास या नाटकातील “जय जय कुंजबिहारी” नाट्यगीत सादर केले. अशीच एक तरुण आश्वासक गायिका म्हणजे प्राजक्ता जोशी छोटा गंधर्वांनी संगीतबद्ध केलेल्या सुवर्ण तुला नाटकातील “कोण ही सुंदरा” हे नाट्यपद प्राजक्ताने सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले त्यानंतर जय जय गौरीशंकर नाटकामधील “नारायणा रमा रमणा” हे अत्यंत गाजलेलं नाट्यपद अत्यंत ताकतीने प्राजक्ताने सादर केले आणि रसिकांचे कान तृप्त केले. मदनाची मंजिरी नाटकातील “ऋतुराज आज वनी आला” या नाट्यपदाने या विद्याधर गीतरंग रजनी ने कळसच गाठला. या सर्व गायकांमध्ये आपल्या जळगावचे एक अत्यंत हरहुन्नरी असे कलाकार डॉ. राजेंद्र फडके यांनी उत्स्फूर्तपणे एक नाट्यपद सादर करण्याची विनंती केल्याने त्यांनाही या निमित्ताने व्यासपीठाची सेवा करण्याचा योग आला. संपूर्ण कार्यक्रमास तितकीच दमदार साथ धनंजय पुराणिक व तरुण आश्वासक कलावंत वरद सोहनी यांनी केली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दीपक चांदोरकर यांनी तर सूत्रसंचालन दीपिका चांदोरकर यांनी केले

Leave A Reply

Your email address will not be published.