पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व शिक्षक दिवस उत्साहात संपन्न !

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

आज भारतीय सण व उत्सवांचे व त्यातून गौरवशाली सांस्कृतिक परंपरेचे गुणगान करीत पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी आनंदोत्सव तसेच शिक्षक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पोदार स्कूलच्या समन्वयिका मेघना राजकोटीया यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. पोदार इंटरनॅशनल स्कुलचे उप- प्राचार्य दीपक भावसार यांनी श्रीकृष्ण प्रतिमेस तसेच सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थीत विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना श्रीकृष्ण जन्माष्टमी व शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांच्या गटांनी विविध मनोरंजक कार्यक्रम सादर केले. श्रीकृष्ण जन्मावर लघुनाटिका सादर केली. आपल्या भाषणातून कृष्णलीलांचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांनी “हाथी घोडा पालखी, जय कन्हैय्या लाल की, या गाण्यावर नृत्य केले तर विद्यार्थिनींच्या एका गटाने “जो है अलबेला… ‘ या गाण्यावर ठेका धरला.’ दुसऱ्या एका विद्यार्थी गटाने “आला रे आला गोविदा आला ….ह्या गाण्यावर बहारदार नृत्य सादर केले व प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी विद्यार्थ्यांनी मानवी मनोऱ्यातून दहीहंडीचा प्रसंग हुबेहूब साकारला. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ठ सादरीकरणासाठी त्यांचे विशेष कौतुक केले.

या पाठोपाठ शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मृण्मयी मोरे व याशिका वाघ या विद्यार्थीनिनी शिक्षक दिनानिमित्त कविता सादर केली. प्रथम जैन याने आपल्या भाषणात थोर शिक्षक, तत्वज्ञानी, लेखक, भारत रत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवनपट श्रोत्यांसमोर उलगडला. तसेच शिक्षक फक्त विद्यार्थीच घडवीत नाहीत तर संपूर्ण समाजाला मार्गदर्शन करीत असतात असे मत मांडले.

या दरम्यान आदरणीय शिक्षकवृन्दांसाठी निरनिराळे मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले गेले. शेरोशायरी, ट्रेजर हंट इ.सारख्या खेळांमधून शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थी जीवनाची आठवण झाली. यावेळी विद्यार्थ्यांच्या समूहाने सामुहिक नृत्य सादर करून आपल्या गुरुजनांचा आदर केला. शिवं बोरकर या विद्यार्थ्याने आपल्या भाषणातून गुरुजनांचे आभार मानून शिक्षकांच्या अमूल्य मार्गदर्शनासाठी आपली कृतज्ञता व्यक्त केली.

शाळेचे नियमित कामकाज विद्यार्थी शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.यातून विद्यार्थ्यांना वर्गात प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव घेता आला. शाळेचे उप-प्राचार्य दीपक भावसार यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या हस्ते शिक्षकवृन्दाचा सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणातून गुरुजनांविषयी आदर व्यक्त करीत त्यांचे आभार मानले. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो, मातृपितृ ऋण, गुरु ऋण आणि समाज ऋण फेडण्यासाठी विद्यार्थ्याने कटिबद्ध असले पाहिजे असे मत त्यांनी मांडले.

पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका उमा वाघ ,प्रशासकीय अधिकारी जितेंद्र कापडे वरिष्ठ समन्वयक हिरालाल गोराणे, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.