खडकाळ जमिनीत चारोळीची शेती करणारा शेतकरी

0

भाग एक

जळगाव येथे सुप्रसिद्ध उद्योजक उद्योग समूहाच्या वतीने संस्थापक कै. भवरलाल जैन यांच्या जन्मदिनापासून तब्बल एक महिनाभर आयोजित ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ या चार एकर मधील कृषी महोत्सवाचा लाभ दररोज महाराष्ट्र सह देशभरातील हजारो शेतकऱ्यांनी घेतला घेत आहेत. शेतकरी शेती पिकांसाठीचे नवीन तंत्रज्ञानाची माहिती इथून घेऊन जात आहेत. मुख्य तंत्रज्ञानाचा वापर केला उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल होऊ शकते हेच या हायटेक शेतीचा नवा हुंकार या आयोजित उपक्रमाचा हेतू होय.

महाराष्ट्र सह देशभरातील शेतकऱ्यांनी आपली शेती आता पारंपारिक पद्धतीने करण्याऐवजी आधुनिक काळातील उच्चतंत्रज्ञानाचा वापर करून केली, तरच शेतकऱ्यांना शेतीचा व्यवसाय परवडणारा आहे. निसर्गाच्या लहरीपणाशी सामना करता शेतकरी मेटाकुटीस येतो आणि आत्महत्या सारखे मार्ग अवलंबतो. या स्थितीवर मात्र मात करण्यासाठी ‘शेती उत्पादन वाढीच्या उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे’ हा एकमेव पर्याय म्हणता येईल. शेतीतील उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतची शास्त्रशुद्ध माहिती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष विविध पिकांच्या बाबतीत माहिती तज्ञांमार्फत दिली जातेय त्या जैन उद्योग समूहाच्या हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवास भेट दिल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी नागपूर येथील ८२ वर्षाचे शेतकरी रमेश देवलसी (जैन) यांची भेट झाली. चारोळी शेती करणारा शेतकरी असल्याचे सांगितल्यावर माझी उत्सुकता वाटली. सुकामेवा मध्ये असणारी ही वस्तू जंगलातून मिळते. तसेच चारोळी महागडी असते. तेवढीच माहिती आपल्याकडे होती. तेव्हा चारोळीची शेती करण्याकडे कसे वळला तसे रमेश देवलसींना विचारले.

आपले स्पष्टीकरण देताना रमेश देवल असे म्हणाले, “वास्तविक आमच्या मूळचा नागपूरला किराणाचा व्यापार आहे. आमच्याकडे शेती नव्हती. २०१६ साली कळमेश्वर तालुक्यातील ‘मोहपा’ या गावात साडेचार एकर खडकाळ जमीन विकत घेतली. विदर्भातील पारंपारिक पिकाऐवजी वेगळे पीक घ्यावे असा विचार मी आणि माझा मुलगा रंजन यांनी केला. आम्ही किराणाचे व्यापारी असल्याने सुकामेवा, काजू, बदाम, खारीक, पिस्ता, किसमिस बरोबर चारोळी सुद्धा असते. सुकामेव्यात चारोळी महागडी मिळते आणि त्याचे उत्पादन जंगलात होते. परंतु अलीकडे जंगल नष्ट होत असल्याने जंगलातील या चारोळीची झाडे सुद्धा नामशेष होत आहेत. म्हणून आपल्या खडकाळ जमिनीत चारोळीची लागवड करून त्याची उत्पादन केले तर ती शेती फायदेशीर होऊ शकते. म्हणून चारोळीची रोपे मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला. तथापी चारोळीची रोपे कुठल्याच नर्सरीत उपलब्ध होत नाहीत. चारोळीच्या बियांपासून रोपे तयार करण्याचा निर्णय घेतला आणि चारोळीची रोपे तयार केली. ती रोपे या खडकाळ शेतीत लावण्याचा निर्णय घेतला. १० बाय १० फुटाच्या अंतरावर रोपांची साडेचार एकरात सुमारे १२०० रोपे लावली. आज सात वर्षे पूर्ण झाली. रोप लावल्यानंतर सहा वर्षांनी चारोळीचे उत्पन्न सुरू होते. सुरुवातीला दोन वर्षे चारोळीच्या रोपांना पाणी द्यावे लागते आणि त्यानंतर त्याला पाणीच लागत नाही.

चारोळीच्या रोपाची वाढ होते आणि त्याचे झाड निर्माण होते. त्यांचे आयुष्य शंभर वर्षापेक्षा जास्त असते. पहिल्या सहा वर्षात एका झाडाला २५ किलो चारोळीची फळे येतात आणि त्यातून ५ किलो प्रत्यक्षात चारोळी निघते. एका किलोला अडीच ते तीन हजार रुपयाला भाव मिळाला, म्हणजे सहा वर्षानंतर एक झाड १२ ते १५ हजाराचे ची उत्पन्न येते. साडेचार एकरातील १२०० झाडांपासून किमान १४ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न वर्षाला मिळते आणि जसजसे हे झाड वाढत जाते, तसे तसे उत्पन्न देखील वाढते, असे रमेश देवलसी यांनी सांगितले.

चारोळीच्या उत्पादनाबरोबर चारोळीची रोपे तयार करून प्रतिप ६० रुपये किमतीला विकले जाते. त्यासाठी मध्य प्रदेशातून चारोळीच्या रोपांना मागणी जास्त असल्याचे रमेश देवलसी यांनी सांगितले. देवलसी पिता-पुत्र किराणा व्यवसाय सांभाळून नागपूर पासून 40 किलोमीटर अंतरावर कळमेश्वर तालुक्यातील मोहपा येथे चारोळीची आगळीवेगळी उत्तम शेती करतात. देवलसी पिता पुत्रांना ‘चारोळी शेतीवाले’ म्हणून परिसरात लोक ओळखतात. त्यांची चारोळीची शेती पाहण्यासाठी दूर दूरून शेतकरी येत असतात, असे त्यांनी सांगितले.

हायटेक शेतीचा नवा हुंकार : शेतीतील क्रांतिकारी पाऊल

जळगाव येथील जैन उद्योग समूहातर्फे आयोजित ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ या कृषी महोत्सवाला भेट देऊन विविध पिकांच्या उच्चतंत्रज्ञानाबाबत प्रत्यक्ष पिकांसह तज्ञांकडून मिळणाऱ्या माहितीबद्दल रमेश देवलसी यांनी आयोजकांना मनापासून धन्यवाद दिले आणि या हायटेक कृषी महोत्सवातून शेती क्रांती होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार असल्याचे मात्र मत व्यक्त केले.
धों. ज. गुरव
सल्लागार संपादक
दै. लोकशाही, जळगाव
मो. 9527003891

Leave A Reply

Your email address will not be published.