जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन

0

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या ठीकाणी निवासी उपजिल्हाधिकारी हे पदसिध्द विशेष अधिकारी असून, नायब तहसिलदार राहुल सोनवणे व महसूल सहाय्यक, अव्वल कारकून महेश सपकाळे यांची या कक्षाकरिता नियुक्ती करण्यात आलेली आहे. अशी, माहिती विशेष कार्य अधिकारी तथा निवासी उप जिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील १८ अर्ज २० डिसेंबर २०२२ पासून मुख्यमंत्री सचिवालय येथे प्राप्त झाले असून यातील ५ अर्ज कार्यवाही करण्यात आले असून ७ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे व त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदन इत्यादी कार्यवाहीमध्ये अधिक लोकाभिमुख, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रिय कार्यालय त्वरीत सुरु करण्याबाबत, सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार सदर कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

तरी यापुढे सर्वसामान्य जनतेने मुख्यमंत्री यांना सादर करावयाचे, आपले दैनदिन प्रश्न शासन स्तरावर असलेली कामे व त्यासंदर्भातील प्राप्त होणारे अर्ज, निवेदन मंत्रालय,मुंबई येथे सादर न करता, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष जळगाव येथे सादर करावीत. असे, आवाहन पदसिध्द विशेष कार्य अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.