मानवाच्या जीवनावर कशापद्धतीने पडतो विचारांचा प्रभाव…

0

लोकशाही विशेष लेख

मनुष्य हा विचारशील प्राणी आहे. जसे विचार तसे आचार आणि जसे आचार तसा परिणाम, म्हणून असे म्हटले आहे की, “मॅन इज दि बंडल ऑफ हिज ओन थॉटस.” माणसाच्या जीवनावर त्याच्या विचारांचा प्रभाव (Influence of thoughts) अधिक असतो. म्हणून विचारांचे महत्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक व्यक्तीची विचार करताना आपली एक विशिष्ट चौकट असते. त्या चौकटीबाहेर जाऊन विचार करणे तो सहसा टाळतो. कारण त्याला आहे यातच ठीक आहे असे वाटते. याच्या बाहेर जाऊन कुठलीही जोखीम घेण्यासाठी तो सहसा तयार नसतो. कारण त्यासाठीची मानसिकता तयार करणे हे फारच कठीण असते. पण काही वेळा काळानुरूप बदल हे स्वीकारावे लागतात. त्यावेळी आपल्या विचारांच्या चौकटी बाहेरचाही विचार आपल्याला स्वीकारावा लागतो. म्हणून आपल्या व्यक्तिमत्वात वैचारिक लवचिकता आणणे ही काळाची गरज ठरते.

सध्याच्या काळात या लवचिकतेची गरज आहे. अन्यथा वैचारिक संघर्ष (Ideological conflict) हा अटळ ठरतो. काही वेळा हा संघर्ष टोकाचाही होतो व त्यातून विपरीत परिणामही घडू शकतात. म्हणून आपल्या विचारांची कक्षा रुंदावणे किंवा सर्वसमावेशक विचार स्वीकारण्याची मानसिकता तयार करणे हेच गरजेचे ठरते. जे बदल स्वीकारतात तेच कालानुरूप आपल्या जीवनाचा प्रवाह अद्यावत ठेवतात म्हणून बदलसाठीची मानसिकता व त्यासाठी लागणारे परिश्रम घेण्याची तयारी जर असेल तर बदलही जीवनात परिवर्तन आणू शकतात. हेही तेवढेच खरे आहे की, जीवनात कुठलाही बदल स्वीकारताना लवकर मानसिक तयारी होत नाही. त्यामुळे बदलाला विरोध हा होणारच पण जर आपण आपली मानसिक तयारी ठेवली, तर ह्या विरोधालाही पार करण्याची आपली कृती निश्चितच फार मोठे परिवर्तन घडवू शकते. तेव्हा आपली वैचारिक कक्षा रूंदावली पाहिजे एवढेच…

प्रा. नितीन मटकरी
जळगाव
मो.न. ९३२६७७८३२९

Leave A Reply

Your email address will not be published.