दरभंगा हमसफर एक्स्प्रेसमध्ये अग्नितांडव (व्हिडीओ)

0

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

नवी दिल्ली दरभंगा हमसफर एक्स्प्रेसच्या  (०२५७०) तीन बोगींना भीषण आग लागल्याची घटना उत्तर प्रदेशच्या इटावा सराय भूपत रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी (१५ नोव्हेंबर) सायंकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बोगीखाली बसवलेल्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने ट्रेनच्या तीन बोगींमध्ये ही आग लागली. आगीमुळे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान अग्निशमन विभागाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात दोन प्रवासी होरपळले गेले आहेत.

https://x.com/ANI/status/1724781375390404690?s=20

सायंकाळी ६ वाजता सराय भूपत रेल्वे स्थानकाजवळ दरभंगा एक्सप्रेसच्या एस १ बोगीला अचानक आग लागली. चालत्या ट्रेनमध्ये धुराचे लोट उठत असल्याचे पाहून प्रवाशांमध्ये घबराट पसरली. काही प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून उडी मारून आपला जीव वाचवला. त्यावेळी ट्रेनचा वेग २० ते ३० किमी दरम्यान होता, अशी माहिती मिळाली आहे.

छठपूजेसाठी मोठ्या संख्येनं लोक बिहारला रवाना झाले होते.  आग लागलेल्या बोगीमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी होते. आगीत तीन बोगी जळून खाक झाल्या असून एस १ डबा पूर्णपणे जळाला आहे. या अपघातात भाजलेल्या दोन प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  ट्रेनचा वेग कमी होताच प्रवाशांनी उड्या मारून आपला जीव वाचवला. काही मिनिटांतच प्रवाशांनी त्यांच्या सामानासह संपूर्ण ट्रेन रिकामी केली. त्यानंतर प्रवासी आणि स्थानकावर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला.

Leave A Reply

Your email address will not be published.