हॅलो डॉकटर; उच्चरक्तदाब कारण आणि निवारण

0

लोकशाही, विशेष लेख

 

एक काळ असा होता कि उच्चरक्तदाब (High blood pressure) अर्थात बीपी किंवा मधुमेह (Diabetes) सारखे विकार हे साधारणपणे पन्नाशीनंतर उदभवताना दिसायचे. कारण तेंव्हाची जीवनशैली हि अतिशय स्थिर आणि ताणतणाव मुक्त स्वरूपाची अशी होती. परंतु अलीकडच्या काही दशकांच्या काळात जीवनशैली झपाट्याने बदललेली दिसतेय. प्रचंड धावपळ, ताणतणाव, फास्टफूड आणि जंक फूड च्या व्यसनामुळे पोषक आहाराची कमतरता,शारीरिक व्यायामाचा अभाव, आणि अनेक प्रकारचे वाद विवाद, धूम्रपान मद्यपानाचा अतिरेक, अशा गोष्टींमुळे आता उच्चरक्तदाबा सारखा विकार हा अगदी विशीतच जडताना दिसू लागलेला आहे. सुरवातीला अगदी नॉर्मल वाटणारा हाच उच्चरक्तदाब मनुष्याला अगदी मृत्यूकडे देखील नेऊ शकतो किंवा अगदी अनेक प्रकारचे शारीरिक अपंगत्व देखील आणू शकतो इतक्या या आजाराचे गांभीर्य आहे. मुळात, उच्चरक्तदाब म्हणजे नेमकं काय ?उच्च रक्तदाबाची लक्षण नेमकी कोणती ? आणि उच्च रक्तदाबाचे उच्चाटन करायचे असेल तर त्यावर उपाय काय ?या सर्व प्रशांचा वेध घेण्यासाठी मुंबईच्या केईएम रुग्णालयात (KEM Hospital) उच्चरक्तदाब सेवा विभागात प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संतोष सलागरे यांच्याशी साधलेला संवाद.

१]उच्चरक्तदाब म्हणजे नेमकं काय ?आणि उच्चरक्तदाबाचे प्रकार किती असतात ?
उच्चरक्तदाब हा मानवी हृदयाशी संबंधित असतो. आपले हृदय हे मिनिटाला ७२ वेळा आकुंचन आणि प्रसारण पावते. या प्रत्येक आकुंचन आणि प्रसारण क्रियेदरम्यान जो दाब निर्माण होतो. हा दाब शरीरातील अंतर्गत रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूला पडतो. या दाबामुळेच रक्ताद्वारे प्राणवायू आणि इतर पोषक द्रव्य शरीरांतर्गत अवयवांना पोहचविली जातात. हा दाब १२० पेक्षा जास्त किंवा ८० पेक्षा कमी असेल तर तो उच्चरक्तदाब असतो ज्याचा शरीरातील प्रमुख अवयवांवर दुष्परिणाम संभवतो. उच्चरक्तदाबाचे प्रामुख्याने २ प्रकार सांगता येतील. अनुवांशिकतेमुळे जो उच्चरक्तदाब असतो ज्याला प्राथमिक उच्चरक्तदाब आपण म्हणू शकतो जो ६० ते ७० टक्के लोकांमध्ये असतो. मात्र जो सेकंडरी किंवा द्वितीय उच्चरक्तदाब असतो तो ५ ते १० टक्के लोकांमध्ये दिसतो. अनेकदा मद्यपान, धूम्रपान केल्याने, शारीरिक व्यायामाचा अभाव, ताणतणावयुक्त जीवनशैली, विविध प्रकारच्या औषधांचा दुष्परिणाम म्हणून हा उच्चरक्तदाब सुरु होतो.

२]वाढत्या वयानुसार उच्चरक्तदाबाचे विकार बळावतात त्याचे महत्व काय ?
४० ते ५० या वयामध्ये उच्चरक्तदाबाचा विकार उद्भवणे हि कॉमन गोष्ट आहे. ४० पेक्षा खालच्या वयोगटांतील युवकांना उच्चरक्तदाबाचा त्रास होणे म्हणजे हा सेकंडरी उच्चरक्तदाबाचा प्रकार मानला जातो. तसेच ६० नंतर चा उच्चरक्तदाब म्हणजे देखील सेकंडरी स्वरूपाचा असतो. सध्या आपली जीवनशैली प्रचंड बदललेली आहे. प्रचंड ताणतणाव, आहाराच्या बददलेल्या सवयी आहारात मिठाचे, तेलकट, तुपकट पदार्थांचे जास्त प्रमाण, मद्यपान धूम्रपान अशा गोष्टींमुळे उच्चरक्तदाब हा विकार जडतो. वयोमानानुसार चेहऱ्यावर शरीरावर सुरकुत्या पडतात त्याप्रमाणे रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते आणि उच्चरक्तदाबाचा त्रास सुरु होतो.

३]अनेकांचा रक्तदाब हा एखादी शस्त्रक्रिया करताना अचानक वाढतो त्याच कारण काय ?
अनेकांना उच्चरक्तदाबाची लक्षण अजिबात नसतात मात्र एखाद्या शस्त्रक्रियेच्या वेळी अशा रुग्णांनाच रक्तदाब हा अचानक वाढतो. अनेकदा हॉस्पिटलच्या वातावरणाचा प्रचंड ताण आल्याने देखील तात्पुरत्या स्वरूपात रक्तदाब हा वाढू शकतो. जर असा रक्तदाब वाढला तर शस्त्रक्रिया पुढे ढकलली जाते. अनेकदा नियमित औषध घेतल्यामुळे देखील त्याचे दुष्परिणाम होऊन रक्तदाब कमी होऊ शकतो. याची कल्पना भूलतज्ज्ञांना असते म्हणूनच ते योग्य ते उपचार सुचवून नंतरच शस्त्रक्रिया करतात.

४]अशी काही विशेष कारण सांगता येतील का जी उच्चरक्तदाब उद्युक्त करायला करणीभूत ठरतात ?
प्राथमिक उच्चरक्तदाब हा आनुवंशिकतेमुळे येतो हे एक प्रमुख कारण सांगता येते. मात्र आता जीवनशैली आणि मुख्यतः आपल्या आहारात खूप बदल होताना दिसतो आहे. तेलकट, चरबीयुक्त पदार्थांचा आहारात मोठ्या प्रमाणात समावेश असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये जाडसर ठार निर्माण होतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांचा ताठरपणा वाढतो आणि उच्चरक्तदाब वाढतो. त्याप्रमाणेच मद्यपान, धूम्रपान अशी व्यसन शरीरातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढवते आणि उच्चरक्तदाब सुरु होतो. नियमित वेदनाशामक औषध घेतल्याने, जिम मध्ये जाणारी मंडळी अनेकदा स्टिरॉइड औषध घेतात त्यामुळे देखील उच्चरक्तदाब बळावतो. काही भोंदू डॉकटर जी औषध देतात त्यामध्ये पाऱ्याचे प्रमाण खूप असल्यामुळे देखील त्याचा दुष्परिणाम शरीरावर होतो आणि रक्तदवबा वाढू शकतो. गट ग्रंथींच काम कमी किंवा जास्त झालं तरी देखील रक्तदाब वाढतो. आपल्या शरीरातील मूत्रपिंड हा महत्वाचा अवयव्य ज्या द्वारे शरीरातील घातक द्रव्य बाहेर फेकली जातात या मूत्रपिंडाचे कार्य बिघडले तरी रक्तदाब वाढतो आणि टायचा किडनीवर परिणाम होतो.

५]उच्चरक्तदाबाची लक्षण नेमकी काय असतात ?
उच्चरक्तदाबाची तशी लक्षण नसतात. सहजपणे रक्त तपासायला गेल्यानंतर किंवा एलआयसी आयुर्विमा तपासणी करताना किंवा रक्तदान करण्यापूर्वी आणि ऑपरेशनपूर्वी रक्तदाब वाढल्याचे अनेकदा निदर्शनास येते. रक्तदाब हा अनेकांना असतो परंतु त्याची लक्षण जाणवत नाहीत. हा सायलेंट किलर असतो. साधारण पणे अनेकदा डोकेदुखी, चक्कर येणे, धाप लागणे, घाम फुटणे अशा लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि तात्पुरती पेन किलर औषध घेतो परंतु ते उच्चरक्तदाबाचे लासखान असू शकते. रक्तदाब वाढल्याने अनेकदा भोवळ येते, शरीरातील हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी होते. छातीत दुखते, उच्चरक्तदाबामुळे डोळ्यांची दृष्टी देखील हळूहळू कमी होते आणि किडनीवर देखील गंभीर दुष्परिणाम होतो. म्हणूनच योग्य वेळी तपासणी करून आपला रक्तदाब नियंत्रित ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.

६]उच्चरक्तदाबाचं निदान कस केलं जात ?
पूर्वी सर्व डॉकटर अगदी सर्रास उच्चरक्तदाब मोजण्यासाठी पाऱ्याच्या मशीनचा वापर करत असत. परंतु आता पाऱ्यावर बंदी असल्याने आधुनिक प्रकारची इलेक्ट्रॉनिक मशीनच्या आधारे रक्तदाब मोजला जातो. रक्तदाब तपासणी करताना डॉकटर दोन आकडे देतात. एक खालचा आकडा आणि वरचा आकडा. हे दोन्ही आकडे १२०/८० या प्रमाणात असले तर रक्तदाब हा सुरळीत आहे असे मानतात. शिवाय नाडी आणि हृदयाचे ठोके देखील तपासले जातात. रक्तदाब तपासताना रुग्णांनी महत्वाची काळजी घ्यावी. लघवी तुंबलेली असेल तर लघवी साफ करावी. मगच रक्तदाब तपासावा रक्तदाबाची गोळी असेल तर ती खाऊनच रक्तदाब तपासायला जावं. शिवाय दवाखान्यात जाताना धावतपळत जाऊन रक्तदाब तपासून नये. हि काळजी घेतली तर रक्तदाब हा व्यवस्थित आणि अचूक मोजता येतो.

७]उच्चरक्तदाब असेल तर रुग्ण बरेचदा घाबरलेले असतात अशा रुग्णांना डॉकटर कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात ?
एखादा नवीन रुग्ण असेल तर केवळ भीतीमुळे देखील तत्परत्या स्वरूपात त्याचा रक्तदाब हा काही प्रमाणात वाढू शकतो. म्हणूनच डॉकटर त्याला धीर देतात आणि त्याच्या रक्तदाबाची पुनर्तपासणी करतात. सौम्य रक्तदाब असेल तर अशा रुग्णाला दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावून रक्तदाब तपासला जातो. रक्तदाब जर वाढलेला असेल तर अशा रुग्णांना आहार पोषक आणि सत्त्वयुक्त घेण्यास डॉकटर सुचवतात. तेलकट तुपकट पदार्थ बंद करून आहारात फळे आणि पाले भाज्यांचा समावेश करायला देखील सांगतात.

८]रक्तदाब वाढल्याने शरीरातील इतर अवयवांवर त्याचा घातक परिणाम होतो तो कसा ?
सातत्याने जर रुग्णाचा रक्तदाब वाढलेला असेल तर शरीरातील जे महत्वपूर्ण अवयव आहेत त्याच्यावर वाईट परिणाम हा होतोच. हृदय हे अत्यंत महत्वाचे आहे. हृदयात दुखते शिवाय छातीत जळजळ आणि सतत दुखते. हृदयातील भिंती जाड होतात आणि अनेकदा हृदयविकाराचा तीव्र झटका देखील येतो. एकूणच तीव्र रक्तदाबामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होते. याच पद्धतीने उच्चरक्तदाबामुळे मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊन देखील रुग्ण दगावू शकतो. अनेकदा मेंदूतील रक्तवाहिन्या चोक अप होतात. मेंदूची कार्यक्षमता कमी झाल्याने पक्षघाताचा झटका देखील येतो. उच्चरक्तदाबाचा दुष्परिणाम हा डोळ्यावर देखील होतो. डोळ्यांच्या यामध्ये जो रेटिना असतो या रेटिनामध्ये नाजूक रक्तवाहिन्यांचे जाळे असते सातत्याने जर रक्तदाब वाढला तर या रक्तवाहिन्या फुटतात आणि अंधत्व येऊ शकते. याच पद्धतीने मूत्रपिंडावर देखील उच्चरक्तदाबाचा परिणाम होतो आणि मूत्रपिंड निकामी होतात. एकूणच उच्चरक्तदाबाचा शरीरातील हृदय, मेंदू, किडनी आणि डोळे या महत्वाच्या अवयवयांवर दुष्परिणाम होतो.

९]या उच्चरक्तदाबाचं नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना काय आहेत ?
उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवायचे असेल तर रुग्णांनी बदलत्या जीवनशैलीची पंचसूत्री सांभाळली पाहिजे. आपल्या वजनावर नियत्रण ठेवायलाच हवं. आहारात मिठाचे प्रमाण अगदी कमी करून फळे आणि पालेभाजां यांचा मोठ्या प्रमाणात समावेश करायला हवा. तेलकट तुपकट पदार्थ, पापड लोणची साठवलेले पदार्थ, बटर, ज्यामध्ये मिठाचे प्रमाण जास्त आहे असे पदार्थ टाळावेत. सतत चालणे, धावणे, व्यायाम, प्राणायाम, अनुलोम विलोम, योग यासारखे पारंपरिक व्यायाम करावेत. मद्यपान, धूम्रपान अशा व्यसनापासून कायम दूर राहावं. आणि उच्चरक्तदाबाची औषध या मध्ये खंड न पाडता ती नियमित घेणं हि पंचसूत्री सांभाळली तर उच्चरक्तदाबावर नक्कीच नियंत्रण ठेवता येत .

Leave A Reply

Your email address will not be published.