या देशाचा पंतप्रधानच सर्वात मोठा बुवा आहे

कोणी केला घणाघात : जिथे अंधश्रद्धा बुवाबाजी तिथे आमचे राज्यकर्ते

0

 

मुंबई

संपूर्ण भारतभरात खडबड उडवणारी घटना उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी आयोजित भोलेबाबांच्या सत्संगावेळी चेंगराचेंगरीच्या रूपाने घडली या चेंगराचेंगरीमुळे तब्बल १२१ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. याप्रकरणी राजकारण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. आज शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी भाष्य केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.

 

भोंदूगिरी तिथूनच सुरु होते

“या देशाचा पंतप्रधानच सर्वात मोठा बुवा आहे. भोंदूगिरी तिथूनच सुरु होते. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, तर मग तसेच वागा ना. गुहेत जाऊन तपस्या करुन स्वत:ला बाबा महाराज म्हणून घ्याल. तुम्ही स्वत:ला देवाचा अवतार म्हणाल. मी बायोलॉजिकल पद्धतीने जन्माला आलो नाही. तुम्ही हिंदू-मुसलमान कराल. ही भोंदूगिरीच आहे. ही बुवाबाजी आहे. देशाच्या पंतप्रधानालाच जर या भोंदूगिरीतून राजकारण करायचं असेल तर तुम्ही काय कराल”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

 

जिथे अंधश्रद्धा बुवाबाजी तिथे आमचे राज्यकर्ते

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ४०  आमदार घेऊन आसामला जातात. कामाख्या देवीकडे रेडे कापतात, यांच्यावर कोण कारवाई करणार, असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला. कायद्याने यांच्यावर का कारवाई होत नाही. जिथे जिथे अंधश्रद्धा आहे, जिथे जिथे बुवाबाजी आहे तिथे तिथे आमचे राज्यकर्ते जातात, मग ते प्रधानमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील. त्यामुळे यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. अनेक लोकं हतबल झाले आहेत. महागाई, बेरोजगारी, गरिबी, लोकांचे प्रश्न आहेत आणि लोक भोंदू लोकांकडे जातात. नरेंद्र मोदी यांना मिळालेली मते ही भोंदूगिरीतून मिळालेली आहेत”, असेही संजय राऊतांनी म्हटले.

 

साधकांच्या मृत्यूला जबाबदार सरकारच

खारघरचा विषय आता सरकारने मागे टाकला आहे. खारघरला जे साधक मरण पावले, हे अत्यंत दुर्दैवी होतं. गृहमंत्री, मुख्यमंत्री तिथे उपस्थित होते, संपूर्ण मंत्रिमंडळ तिथे उपस्थित होतं. पण खारघरच्या त्या दुर्घटनेला शेवटी जबाबदार कोणालाही ठरवलं नाही. एसआयटी  नेमणं हे फक्त धुळफेक असते, अशा घटनांची चौकशी करण्यासाठी सरकार जेव्हा एसआयटी नेमते तेव्हा ती धूळफेक असते. इतक्या साधकांच्या मृत्यूला जबाबदार कोण, मी तर म्हणतो सरकार आहे, सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता, असेही संजय राऊत म्हणाले.

 

बाबाला राजकीय संरक्षण, अद्याप गुन्हा दाखल नाही

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो कार्यक्रम खारघरला भर उन्हामध्ये घेतला. हजारो साधक जमले, आत त्यांची व्यवस्था नव्हती, त्यांच्या डोक्यावर छप्पर नव्हत. देशाचे गृहमंत्री तिथे उपस्थित होते. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला, त्यातून ती धावपळ झाली. हाथरस प्रकरणानंतर योगी आदित्यनाथ यांनी त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल करत असताना जो मुख्य भोला बाबा आहे ज्याच्यामुळे हे घडलं आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही कारण त्याला राजकीय संरक्षण आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.