गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

0

जळगाव – शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र देत बहुजनांना उन्नती आणि समाजोद्धाराचा मार्ग दाखवणारे व सामाजिक न्याय व समतेचा पुरस्कार करत समाजातील उपेक्षितांसाठी संघर्ष करणारे प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील हे उपस्थित होते. त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले. त्यांच्यासोबत महाविद्यालयाचे प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), प्रा.ईश्वर जाधव (रजिस्ट्रार), डॉ. विजयकुमार वानखेडे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर), महाविद्यालयातील सर्व शाखांचे प्रमुख, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील तसेच इतर मान्यवर आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयातील अभियांत्रिकी तसेच तंत्रनिकेतनच्या डॉली घेटे, पूर्वेश बर्‍हाटे, सेजल सातव,प्रियंका गजरे व शिवम चित्ते या विद्यार्थ्यांनी त्यांची मनोगते व्यक्त केली. त्यांच्या मनोगतात त्यांनी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या शैक्षणिक कारकिर्दी पासून तर समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्यापर्यंत माहिती विशद केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील दिन दलितांना समानता आणण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला आंबेडकरांच्या विचारांनी लाखो तरुणांना प्रेरणा दिली आणि त्यांच्या विचारांचे अनुसरण केल्याने अनेक तरुणांचे जीवन बदलले.त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे काही अमूल्य विचार मांडलेत त्यात जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाही तसेच शिक्षित व संघटित व्हा उत्साही व्हा अशा अनेक बाबींवर विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला.

तसेच तंत्रनिकेतनच्या प्रा.वेणू फिरके यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कामांची सखोल माहिती दिली. २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना स्वीकारणार्‍या समितीचे ते प्रमुख होते. ते व्यवसायाने न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि देशाचे पहिले न्याय आणि कायदा मंत्री होते. संविधानाचा मसुदा तयार करताना आंबेडकरांनी महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक अधिकारांचा पुरस्कार केला. अतिशय समर्पक शब्दात उदाहरणाचे दाखले देत त्यांनी त्यांचे मनोगत मांडले.त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी बाबासाहेबांनी समाजातील सर्व घटकांसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच बाबासाहेब केवळ मागासवर्गीय यांच्या हक्कासाठी लढले नाहीत, तर पक्षपात आणि जाती व्यवस्थाविरुद्ध आवाज उठवणारे समाज सुधारकही होते असे त्यांनी नमूद केले. सध्याच्या तरुणाईने त्यांचे विचार हे अंगी बनवायला पाहिजे जेणेकरून एक सक्षम भारत तयार होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हेमाक्षी राणे या विद्यार्थिनीने केले तसेच कार्यक्रमाचे नियोजन प्रा. नकुल गाडगे यांनी पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.