घरातल्याच गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली तर आपल्याच घराची उर्जा वाढेल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

“ज्या उद्देशासाठी गणेशोत्सव साजरा केला जात आहे तो म्हणजे ‘सर्वांनी एकत्रित येणे’, तो तिथे खऱ्या अर्थाने माझ्या लहानपणी पूर्ण होताना दिसायचा. त्यामुळे तेव्हाचा गणेशोत्सव कायम आठवणीत राहील. मात्र आज ते दिसून येत नाही, ही मनात आज सल आहे. समाजासाठी माझा एक प्रश्न देखील आहे. तो म्हणजे, प्रत्येकाच्या देव्हार्‍यात गणेश मूर्ती आहे. तिला जर तुम्ही विशेष प्राधान्य देऊन तिची पूजा अर्चा केली, तिला मानसन्मान दिला तर चालणार नाही का? कारण आपण हे दहा दिवस गणेशोत्सवात आपली ऊर्जा खर्च करतो. गणेश विसर्जन झाल्यानंतर जी निसर्गाची हानी होते त्याचे कुठे ना कुठे परिणाम फिरून आपल्यालाच भोगावे लागतात. ते कुठेही सुटत नाही. पण जर हेच घरातल्या गणपती सोबत केलं, तर वास्तुशास्त्र म्हणून मी सांगेल की आपल्या गणेश मूर्ती सोबत आपल्या वास्तूची देखील ऊर्जा वाढेल आणि ती गणेश मूर्ती खऱ्या अर्थाने सिद्ध होईल. एक प्रकारे मंदिरातल्या गणेश मूर्ती प्रमाणे ती मूर्ती आपल्याला ऊर्जा देईल.” असे आवाहन नित्यानंद अनुभूती फाउंडेशनच्या संस्थापिका माई यांनी आरतीवेळी केले.

बुधवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी लोकशाही कार्यालयात आरतीसाठी नित्यानंद अनुभूती फाउंडेशनच्या संस्थापिका माई आणि पारोळा तसेच धरणगाव येथील उद्योजक अमृत ग्रुप पारोळा तथा पारोळा व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष केशव क्षत्रिय, महेश ग्रुपचे संचालक महेश हिंदुजा, योगी कलेक्शनचे संस्थापक गणेश बिचुवे, समर्थ बॅटरीचे संस्थापक चंद्रकांत पाटील व त्यांचा परिवार उपस्थित होते. आरतीनंतर मान्यवरांशी मनसोक्त चर्चा करत त्यांच्या आठवणीतील गणेशोत्सवाच्या स्मरणिकांना यावेळी उजाळा देण्यात आला.

यावेळी माईंनी सांगितले की, “माझ्या आठवणीतला गणेशोत्सव हा माझ्या लहानपणीचा. माझं शिक्षण झालं नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे. निफाड सहकारी साखर कारखान्याचा सार्वजनिक गणपती हा त्यावेळी सर्व गावांचा मिळून एकच गणपती स्थापन होत असे. त्या गणपतीसाठी आजूबाजूची जवळपास सर्व गावातील मंडळी त्या उत्सवात सामील होण्यासाठी येत असे. या दिवसांमध्ये तिथे दररोज एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जात असे. ते सर्वांसाठी खुले असायचे. त्यावेळी आम्हाला चांगल्या चांगल्या नाटकांची मेजवानी मिळत असे. नृत्य हा माझा अविभाज्य घटक आहे. नृत्य हे माझे जीवन आहे, आत्मा आहे. आणि या कारणाने देखील हा बालपणीचा गणेशोत्सव माझ्या विशेष आठवणीतला आहे. कारण या ठिकाणी या गणेशोत्सवामध्ये माझा दरवर्षी एक नृत्याचा कार्यक्रम निश्चित असायचा. त्यामुळे ही आठवण आजपर्यंत माझ्या मनात कायम आहे. मी नृत्य देखील उत्तम प्रकारे करायचे त्यामुळे

एवढ्या सभा नागरिकांसमोर आपल्याला आपल्या आवडती गोष्ट करायला मिळते याचा परमानंद असायचा. मी जितकी वर्ष त्या ठिकाणी राहिले त्या दरवर्षी मी यात अगदी मनापासून सहभागी व्हायचे. दैनंदिन जीवनात आपल्या जगण्यातून संध्याकाळी वेळ काढून असंख्य नागरिक सुमारे पाच ते सहा हजार लोक या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित असायचे. आपल्या जीवनातले दुःख विसरून लोक त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येत होते आणि आनंद शोधत होते.”

“मात्र आता घराघरात गणपती झाले त्यामुळे कुठेतरी नकळतपणे का होईना यामध्ये स्पर्धा वाढलेली दिसून येते माझा गणपती त्याच्या गणपती पेक्षा उत्कृष्ट कसा होईल यामध्ये ही स्पर्धा चालू असते नकळतपणे आपण देशाच्या भावनेला वाढवत आहोत कधीकधी तर वर्गणीसाठी वेगळे प्रकार सुरू होतात. कधी कधी तर इमोशनली अत्याचार सुद्धा होतो इथपर्यंत काही वेळा वर्गणीसाठी मजल गेलेली असते.”

यावेळी बोलताना अमृत ग्रुपचे केशव क्षत्रिय यांनी सांगितले की, “त्याकाळी मी राहायचो तिथे असलेल्या एका पडीक घरात ती जमीन स्वच्छ करून तिथे सार्वजनिक गणेश मंडळ म्हणून गणेश मंडळाची स्थापना केली होती. आजपर्यंत ते गणेश मंडळ कुठलंही विघ्न न येता अविरत चालू आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही त्या गणेश मंडळाची स्थापना केली. हा एक प्रकारे गणेशोत्सव गणपतीचा आशीर्वाद होता.”

यावेळी बोलताना महेश ग्रुपचे संचालक महेश हिंदुजा यांनी सांगितले की, “मी सुमारे तेव्हा दहा-अकरा वर्षाचा असेल. आमच्या कासार गल्लीमध्ये कासार गणपती मंडळाजवळच आम्ही लहान मुलांनी जय शिवाजी गणेश मंडळाची स्थापना केली होती. तेव्हापासून आजपर्यंत ते गणेश मंडळ यशस्वीरित्या सुरू आहे. आम्ही घरी गणपती बसवत नव्हतो. मात्र 1999 ला माझ्या वडिलांनी एका बाजारपेठेत जागा घेतली. त्या ठिकाणी आम्हाला खोदकामांमध्ये जवळजवळ एक फुटाच्या उंचीची लाकडी सुबक अशी गणेश मूर्ती त्या उत्खननात सापडली होती. तो एक प्रकारे आम्हाला गणपतीचा आशीर्वादच होता. आज त्या ठिकाणी आमचा व्यवसाय सुरू आहे. मात्र आज पर्यंत आम्हाला कधीही त्या व्यवसायातही आणि गणेशोत्सवातही कोणतेही विघ्न आले नाही. हा आमच्यावरचा आशीर्वाद गणरायाने कायम ठेवला आहे. 1999 पासून म्हणजे ती गणेश मूर्ती आम्हाला मिळाल्यापासून आम्ही तिथेच दरवर्षी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करतो. आजही ती मूर्ती आमच्या देव्हाऱ्यात आहे.

यावेळी हिंदुजा कलेक्शनचे संस्थापक गणेश बिचुवे यांनी सांगितले की, “2018 मध्ये मी गणेशोत्सवाचे स्वरूप पाहताना एक गोष्ट लक्षात घेतली की, यावेळी उडवला जाणारा गुलाल हा तिथे असलेल्या सर्वांसाठीच घातक ठरत आहे. मी यामध्ये बदल करून, काहीसे प्रयत्न करून गुलाल ऐवजी फुलांचा वापर करण्याची प्रथा सुरू केली. ही प्रथा आजपर्यंत सुरू आहे. मात्र ही प्रथा सुरू केल्याच्या दुसऱ्याच वर्षी मला त्या गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा आशीर्वाद श्री गणेशाने दिला. त्यामुळे 2018 चा हा अनुभव माझ्यासाठी विशेष आठवणीतला आहे. यानंतर याचा परिणाम असा झाला की त्या ठिकाणी महिलांनी देखील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभाग नोंदवला. गुलाल नसल्यामुळे त्यांनाही ते आकर्षित करू लागले. खऱ्या अर्थाने बघायचं झालं तर गुलालमुळे बऱ्याचदा नुकसान होत असतं. त्याच्या ऐवजी आपण फुलांची उधळण केली तर त्या गणेशोत्सवाचे एक पावित्र्य आपण राखू शकतो.”

यावेळी समर्थ बॅटरीचे संस्थापक चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मी गेल्या 22 वर्षापासून गणेशोत्सवाच्या गणेशोत्सवात कार्यरत आहे. आम्ही घरी गणपती बसवत नाहीत, मात्र एक प्रकारे गणरायाचा आशीर्वाद म्हणावा की मला दरवर्षी मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी मला सहपरिवार आरतीसाठी विशेष आमंत्रण येत असे. दरम्यान मी गणेश मंडळांना बनियान वाटप देखील करायचो. त्यामुळे माझ्या गेल्या बावीस वर्षांपासूनच्या दरवर्षीच्या अनेक आठवणी आहेत. आम्ही घरी गणपती बसवत नाहीत मात्र आता नव्या घरात आलो आहोत. तेव्हा या ठिकाणी या गणेशोत्सवाच्या परंपरेला आम्ही सुरुवात करणार आहोत.”

 

शब्दांकन : राहुल पवार 

उपसंपादक

दै. लोकशाही

Leave A Reply

Your email address will not be published.